रीलस्टारची गुंडगिरी..सोशल मीडियाचा ‘किंग’ निघाला वास्तवातील गुन्हेगार..भेटीच्या बहाण्याने बोलावून तरुणावर जीवघेणा हल्ला
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-मोबाईलच्या स्क्रीनवर स्टाईल आणि रुबाब दाखवून तरुणाईला आकर्षित करणाऱ्या एका प्रसिद्ध रीलस्टारचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.सोशल मीडियावरील चमकधमक आणि प्रत्यक्षातील गुन्हेगारी चेहरा उघडा पाडणाऱ्या या घटनेत, रीलस्टार सनी जाधव आणि त्याच्या ४ साथीदारांनी मिळून एका तरुणाला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार अहिल्यानगर शहरात घडला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,आरोपी सनी जाधव आणि त्याच्या साथीदारांनी पूर्वनियोजित कट रचला होता.त्यांनी पीडित तरुणाला विश्वासात घेऊन,ओळखीच्या माध्यमातून एका ठिकाणी तातडीने भेटीसाठी बोलावले.तरुण तिथे पोहोचताच आधीच दबा धरून बसलेल्या या टोळीने त्याला घेरले.काही समजण्याच्या आतच आरोपींनी शिवीगाळ करत लोखंडी व लाकडी दांडक्याने थेट त्याच्या डोक्यावर गंभीर प्रहार केले.
हा हल्ला इतका भीषण होता की पीडित तरुण रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.आपल्या मित्राचा जीव धोक्यात असलेला पाहून त्याला वाचवण्यासाठी धावून आलेल्या दुसऱ्या एका तरुणावरही या टोळीने निर्घृणपणे हल्ला चढवला. “यालाही सोडू नका” म्हणत त्यालाही बेदम मारहाण करण्यात आली.या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.सर्व पाचही आरोपींनी संगनमताने हा जीवघेणा हल्ला केल्याचे फिर्यादीत स्पष्ट म्हटले आहे.सोशल मीडियावर स्वतःला ब्रँड आणि ‘किंग’ म्हणवून घेणाऱ्या अशा रील स्टार्सच्या मागे असणारे हे भयावह वास्तव समोर आल्यानंतर अहिल्यानगर शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. “स्क्रीनवरचा स्टार वास्तवात शहरात भीतीचे वातावरण निर्माण करत आहे का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.घटनेची भीषणता पाहता स्थानिक पोलिसांनी तातडीने या पाचही आरोपीं विरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांची पथके आरोपींच्या शोधात रवाना झाली असून,या हल्ल्यामागचा मुख्य सूत्रधार कोण आणि नेमका हेतू काय होता,याचा कसून तपास पोलीस करत आहेत.
