ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय घोलप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश..काकडवाडी हद्दीतील ‘पालखी मार्ग’ रस्ता दुरुस्तीला वेग..!भाविक व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण..!
संगमनेर (राजेंद्र मेढे/प्रतिनिधी):-संगमनेर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या गावांना जोडणाऱ्या तसेच काकडवाडी हद्दीतील गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पालखी रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर वेग आला आहे. रयत शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून उठवलेल्या आवाजामुळे या रस्त्याचे डांबरीकरण आणि साईड पट्ट्या बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.हा पालखी मार्ग आषाढी वारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. दरवर्षी आषाढी वारीनिमित्त श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होणारे लाखो वारकरी व भाविक याच मार्गावरून मार्गक्रमण करत पायी पंढरपूरकडे रवाना होत असतात.रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वारकऱ्यांना आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.हीच गंभीर बाब ओळखून पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी या समस्येचा सातत्याने वेध घेतला होता.
पत्रकार घोलप यांनी संबंधित मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (संगमनेर विभाग) चे कार्यकारी अभियंता राहुल गायकवाड यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन व निवेदनाद्वारे हे रखडलेले काम आणि साईड पट्ट्या बुजवण्याचे काम तातडीने सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती. प्रशासनाने या मागणीची अत्यंत गांभीर्याने दखल घेत थेट प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे.पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी वेळोवेळी विविध वर्तमानपत्रे,न्यूज वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून या लोकप्रश्नवर प्रकाश टाकला होता.या सर्व माध्यमांच्या विशेष सहकार्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागला असून,याचे श्रेय दत्तात्रय घोलप यांच्या अविरत संघर्षाला जात आहे.रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाल्याबद्दल काकडवाडी परिसरातील नागरिकांनी आणि वारकरी संप्रदायाने त्यांचे जाहीर आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.
