एमआयडीसी इंटरप्राईजेस कंपनी’ चे छताचे पत्रे उचकटून चोरी करणाऱ्या अट्टल चोराला पोलिसांकडून अटक एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नागापूर एमआयडीसी परिसरातील ‘इंटरप्राईजेस कंपनी’चे छताचे पत्रे उचकटून आत प्रवेश करत चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला पोलिसांनी अत्यंत शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेला हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप रामभाऊ ठोकळ (वय ४६ वर्षे, व्यवसाय- इंटरप्राईजेस कंपनी, रा. तपोवन रोड, सावेडी, ता. जि. अहिल्यानगर) यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.दिनांक २० मे २०२६ रोजी रात्री १०:०० वाजल्यापासून ते २१ मे २०२६ रोजी सकाळी ०८:०० वाजण्याच्या सुमारास, कोणीतरी अज्ञात चोराने त्यांच्या नागापूर एमआयडीसी येथील कंपनीच्या छताचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला.
चोरट्याने कंपनीतून ७०,९१८/- रुपये किमतीच्या आणि ३०.५ किलो वजनाच्या निकेल प्लेट्स चोरून नेल्या होत्या.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३५३/२०२६ भा.न्या.सं. का. क. ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री.माणिक बी. चौधरी यांना गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तात्काळ तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले.त्यानुसार तपास पथक माहिती गोळा करत असताना, गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना एक खात्रीशीर माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छोटन मियाँ मुल्लु मियाँ (वय २६ वर्षे, रा. तेज इंडस्ट्रिज ब्लॉक नं. २९२/३, एमआयडीसी नागापूर,ता.जि. अहिल्यानगर मूळ रा. ग्राम रूरपुरूआ,थाना महनिया, जिल्हा भगुआ,राज्य बिहार) याला ताब्यात घेतले.त्याची कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.पोलिसांनी आरोपीला रीतसर अटक केली असून, त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी ४०,१२०/- रुपये किमतीच्या आणि १७ किलो वजनाच्या निकेल प्लेट्स दोन पंचांसमक्ष जप्त केल्या आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.राजू आप्पासाहेब सुद्रिक करत आहेत.सदरची उल्लेखनीय कामगिरी श्री.मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक, आणि श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि.माणिक बी.चौधरी,पोलीस अंमलदार राकेश खेडकर,पोहेकॉ राजू सुद्रिक,पोहेकॉ सचिन आडबल,पोकॉ दीपक फुंदे,पोकॉ नवनाथ दहिफळे,पोकॉ किशोर जाधव,पोकॉ राहुल गुंडु,पोकॉ अरुण सांगळे, यांनी केली आहे.
