बेकायदेशीर गुंठेवारी व्यवहारांच्या तक्रारींची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर प्रतिनिधी(दि.२८ एप्रिल):-संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या बेकायदेशीर गुंठेवारी व्यवहारांच्या तक्रारी मोठ्या प्राप्त झाल्या आहेत.यासर्व व्यवहारांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आढावा बैठकीत दिली.मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत तालुक्यातील जिल्हा परिषद गट निहाय बैठकांचे आयोजन होते.घुलेवाडी,संगमनेर खुर्द या जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये सुरु असलेल्या शासकीय योजनांच्या कामांचा आढावाही घेण्यात आला. उपस्थित ग्रामस्थ आणि पदाधिका-यांनी केलेल्या विविध प्रश्नांबाबत गांभिर्याने दखल घेण्याची सुचना या बैठकीमध्ये मंत्र्यांनी दिल्या. प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे,गटविकास आधिकारी अनिल नागणे यांच्यासह सर्व शासकीय विभागाचे वरिष्ठ आधिकारी तसेच जेष्ठ नेते वसंतराव देशमुख,गुलाबराव सांगळे, भाजपाचे तालुका अध्यक्ष सतिष कानवडे,शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले,माजी नगराध्यक्ष जावेद जहागिरदार,अमोल खताळ आदि पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.प्रारंभी मंत्री विखे पाटील यांनी या दोन्हीही गटांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या योजनांच्या कामांची माहीती आधिका-यांकडून जाणून घेतली.बहुतांशी कामांबाबत ग्रामस्थांना विचारात न घेताच ठेकेदारांनी कामे सुरु केल्याचे निदर्शनास आले. याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करुन, योजनेच्या माहितीचे फ्लेक्सबोर्ड लोकांना कळण्यासाठी तातडीने लावावेत या सुचना यापुर्वीच देण्यात आल्या होत्या.मात्र त्याची अंमलबजावणी तलाठी,ग्रामसेवक आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून होणार नसेल तर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.या तालुक्यामध्ये त्याच त्याच ठेकेदारांकडून शासकीय योजनांची कामे घेतली जात असल्याने ठराविक ठेकेदारांची मक्तेदारी निर्माण झाली आहे.ग्रामस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी सुध्दा या योजनेबाबत जागृत राहुन वेळप्रसंगी चुकीचे काम करणा-या ठेकेदारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचेही त्यांनी सुचित केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जलजीवन मिशन योजना सुरु झाली आहे.या योजनेला कुठेतरी बदनाम करण्याचे कारस्थान सुरु असल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या पदाधिका-यांनी या योजनेबाबत अतिशय जागृत राहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करुन, मंत्री विखे पाटील यांनी अद्यापही तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशिर वाळू उपसा सुरु असल्याबद्दलही तलाठी,ग्रामसेवक यांना कडक शब्दात खडेबोल सुनावले.राज्यात एकीकडे आपण वाळू धोरणाची अंमलबजावणी सुरु करीत आहोत.परंतू दुसरीकडे तुम्हीच जर महसूल खात्याला बदनाम करण्यासाठी कारणीभूत ठरत असाल तर मला कारवाई करण्याशिवाय गत्यंतर नाही अशा शब्दात त्यांनी तलाठी आणि ग्रामसेवकांना सुचना दिल्या.शहराजवळील अनेक गावांमध्ये बेकायदेशीर गुंठेवारी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गुंठेवारीच्या संदर्भात अद्याप राज्य सरकारचे कोणतेही धोरण ठरलेले नाही.तरीही या तालुक्यात असे व्यवहार होतात तरी कसे हे गंभिर आहे.याबाबत तलाठ्यांनी सुध्दा दुर्लक्ष केले.झालेल्या संपूर्ण व्यवहारांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी होणार असल्याचे त्यांनी या बैठकीत जाहीर केले.जमीन मोजणी कार्यालयांच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात आहेत.यामुळे या कार्यालयांमधील आधिका-यांनी कामात सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.