जीवे मारण्याचा प्रयत्न करत प्रवाशाला लुटणाऱ्या आरोपीस कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अहमदनगर (दि.१८ ऑगस्ट):-जीवे मारण्याचा प्रयत्न करत प्रवाशाजवळील पाच हजाराची रोकड व सॅमसंग मोबाईल घेऊन पसार झालेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पुणे बसस्थानक परिसरातून पळून जात असताना कोतवाली पोलिसांनी पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अकिब उर्फ चुस्या जिशान सय्यद (वय-३० वर्षे, रा. वाबळे कॉलनी, फकीरवाडा अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.माळीवाडा बसस्थानकाच्या जवळ भगवंत नागराज थोरात (वय ४२ वर्षे धंदा मजुरी रा. जेलरोड, नाशिक जि.नाशिक) यांना दोन अनोळखी इसमांनी मोपेड दुचाकीवर बसवुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करत पाच हजाराची रोकड व मोबाईल चोरून नेला होता. कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक यादव यांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. पोलीस निरीक्षक यादव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हा गुन्हा अकिब सय्यद याने केला असून तो पुणे बस स्थानक परिसरात येणार आहे. आरोपीला पकडण्यासाठी पुणे बसस्थानक परिसरात कोतवाली पोलिसांनी सापळा लावला होता. आरोपी अकिब सय्यद याला पोलिसांची चाहूल लागताच मोटरसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.पोलीस निरीक्षक यादव रिंकू काजळे सतीश भांड संतोष जरे सलीम शेख यांनी माळीवाडा बस स्थानक हातमपुरा मार्केट यार्ड चौक सहकार सभागृह महात्मा फुले चौक सारसनगर या परिसरात पाठलाग करून आरोपीला जेरबंद केले आहे. तसेच आरोपी सय्यद याने त्याचा साथीदार जाबीर ऊर्फ जानु सादिक सय्यद (रा.शाहा कॉलनी गोविंदपुरा अहमदनगर) याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विश्वास भांसी करीत आहेत.पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस अंमलदार तनवीर शेख,गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे,सलीम शेख,रियाज इनामदार,अभय कदम, संदिप थोरात,अमोल गाढे,कैलास शिरसाठ,सागर मिसाळ,सोमनाथ राऊत,सुजय हिवाळे,अतुल काजळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.