
अहमदनगर (दि.११ सप्टेंबर):-नगरमधील कोतवाली पोलिस स्टेशन अंतर्गत शहराची मोठी बाजारपेठ, सर्व धर्मीय धार्मिक स्थळे तसेच मोठी लोकवस्ती आहे. हा परिसर संवेदनशील म्हणून ओळखला जायचा. या संपूर्ण परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली पोलिस नेहमीच प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचा कारभार स्विकारल्या नंतर पोलिस निरीक्षक चंद्रेशखर यादव यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात यश मिळविले आहे. तसेच सर्वच जाती-धर्मांचे सणोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी कोतवाली पोलिस व आयोजकांमध्ये सकारात्मक संवाद प्रस्थापित करण्यात चंद्रशेखर यादव यांनी विशेष भूमिका बजावली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष, नगर शहर अध्यक्ष तथा कापड बाजार जैन मंदिरचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी केले.
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुन्हे शोध तसेच शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या कामगिरीबद्दल नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.या बद्दल तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रशेखर यादव यांचा महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनच्या वतीने सुभाष मुथा यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी उद्योजक श्रीकांत (बॉबी) गायकवाड, व्यापारी शेखर गांधी, युवा उद्योजक संग्राम गायकवाड, व्यापारी समीर मुथा, आनंद मुथा, विनित मुथा, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, विश्वास भांसी,प्रविण पाटील, सहायक फौजदार राजेंद्र गर्गे,तन्वीर शेख,पो.ना.योगेश खामकर, रियाज इनामदार, योगेश भिंगारदिवे, सुजय हिवाळे, जयंतराव पांधरकर, संदीप थोरात आदी उपस्थित होते.
सुभाष मुथा पुढे बोलताना म्हणाले की, चंद्रशेखर यादव यांच्या धडक कारवायांमुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला असून व्यापारी वर्गात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कमी कालावधीत गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. शाळा, कॉलेज परिसरातील छेडछाडीच्या पार्श्वभूमीवर टार्गटांना त्यांनी जरब बसवली आहे.
अनेक किचकट गुन्ह्यांचा तपास त्यांनी शिताफीने लावला आहे. सोबतच सर्वच जाती-धर्माच्या मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी यादव यांनी बैठका घेऊन शांततेचे आवाहन केले व आयोजकांना वेळोवेळी केलेल्या सुचनांमुळे मिरवणुका शांततेत आणि उत्साहात पार पडल्या आहेत. आता विविध सण उत्सवांना सुरूवात होत आहे. याकाळातही कोतवाली पोलिस सक्षमपणे शांतता व सुव्यवस्था कायम राखतील असा विश्वास व्यक्त केला. मुख्य बाजारपेठेत बेशिस्त वाहतूक, पार्कींगची मोठी समस्या होती. यादव यांनी अतिशय कुशलतेने बाजार पेठेतील वाहतूक सुरळीत केल्याने व्यापारी आणि ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिस निरीक्षक यादव यांनी हद्दीत घडत असलेल्या प्रत्येक गुन्ह्याबाबत तातडीने उपाययोजना करून नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वासाची आणि आपुलकीची भावना वाढीस लावली आहे. अशा सक्षम अधिकाऱ्यांमुळे गुन्हेगारीला चाप बसण्यास मदत होत आहे. व्यापारी, व्यावसायिक सुरक्षित भावनेने आपला व्यवसाय करतात.परिणामी बाजारपेठेला, शहराच्या अर्थकारणालाही चालना मिळण्यास मदत होते, असे सुभाष मुथा यांनी सांगितले.