
संगमनेर प्रतिनिधी/राजेंद्र मेढे (दि.१४ सप्टेंबर):-अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव गावात बैलपोळा सण अतिशय उत्साहात गावातील शेतकरी बांधवांकडून साजरा करण्यात आला.
यावेळी सर्वच बैलांना आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले होते रंगरंगोटी करण्यात आली होती.शेतकऱ्याचा मित्र असणारा बैल याचे आज विधिवत पद्धतीने पूजन करुन गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती.भारत हा कृषिप्रधान देश आहे या कृषीप्रधान संस्कृतीमध्ये बैलाला अनन्य साधारण महत्त्व आहे.
तो एक शेतकऱ्याच्या कुटुंबातील महत्त्वाचा घटक मानला जातो.त्यामुळे शेतकऱ्याला शेती करताना त्याची खूप मोठ्या प्रमाणात मदत होत असते.म्हणून बैलपोळा या सणाच्या दिवशी बैलांचा ऋण व्यक्त करण्यासाठी विधिवत पूजन करून त्यास नैवेद्य दाखवला जातो.तो खरोखरच कृषीप्रधान अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचा कणा आहे.बैल एक शेतकऱ्यांचा मित्रच आहे.घरचा एक सदस्य म्हणून त्याच्याकडे बघितले जाते.दुष्काळाचे सावट असतानाही शेतकरी बांधवांकडून हा बैलपोळा आनंदी वातावरण साजरा करण्यात आला.यावेळी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस बांधवांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता.