
संगमनेर/दत्तात्रय घोलप:-संगमनेर तालुक्यातील तळेगाव-निमोण गटातील दुष्काळी भागातील अनेक गावांना वरदान ठरणारे भोजापूर पूर चारी पाणी हे दरवर्षी ठराविक गावांपर्यंत सोडण्यात येत असते.

मात्र हे पाणी निमोण- पिंपळापर्यंतच येते तिथून पुढे चारी नादुरुस्त असल्या कारणाने कायमच पुढील लाभक्षेत्रात असणारे पिंपळे येथील काही भाग,सोनोशी,बिरेवाडी,नान्नज दुमाला,पारेगाव खुर्द,काकडवाडी,तळेगावचा धनगरवाडा व काही भाग,तिगाव हा टेलपर्यंत लाभधारक क्षेत्रातील शेतकरी कायमच पाण्यापासून उपेक्षित राहिले आहेत.त्याला कारणही तसेच आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून सदर चारी नादुरुस्त अवस्थेत आहे.
चारीमध्ये असणारा चढ-उतार यामध्ये कुठेही ताळमेळ नाही.अनेक शेतकऱ्यांनी चारीच्या मध्येच मातीचे भरवे टाकून रस्ते तयार केले आहेत.हे रस्ते कायमचा अडथळे ठरतायत.या सर्वच अडचणीमुळे पुढे पाणी जाण्यास अडथळे निर्माण होत आहे.महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने भोजापूर पूर पाणी सोडण्यात आले हे मात्र जरी खरं असले तरी या भागातील लाभक्षेत्रातून जाणारी चारी ही अद्यापही नादुरुस्त आहे.जलसंधारण विभागामार्फत या ठिकाणी सध्यातरी १ जेसीबी मशीन चारी उकरण्यासाठी कार्यरत करण्यात आले आहे.सध्या हे काम अतिशय धिम्या गतीने आजपासून सुरू झाले आहे.चारी उकरण्यासाठी अजूनही पोकलँड व जेसीबीची गरज पडणार आहे.त्याकरता जलसंधारण व जलसंपदा विभागाने जेसीबी,पोकलेन यांची संख्या वाढवण्याची गरजेचे आहे.
तरच पुढील लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना लवकरच पुढे पाणी नेण्यास मदत होईल.अजूनही हे पाणी टेल पर्यंत येण्यास जवळजवळ १८ ते १५ किलोमीटर अंतर लांब आहे.चारी दुरुस्तीचे काम लवकरच झाले पाहिजे.अन्यथा हा भाग कायमच वंचित होता आणि वंचित राहील यात शंका नाही.त्याकरता जलसंधारण,जलसंपदा विभागाने तात्काळ कार्यवाही करून यंत्रसामुग्री वाढवणे अतिशय गरजेचे आहे.सध्या या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने भोजापूर पूर चारी नंबर ५ वर तळ ठोकून आहेत.भोजापूर पूर चारी द्वारे सोडलेले पाणी सध्या आता चारी नंबर ५ मधून पिंपळे गावाच्या दिशेने रवाना झाले आहे.त्यामुळे आता टेल पर्यंत पाणी कधी येणार हाच प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे.लवकरात लवकर भोजापुर पूर चारी दुरुस्त करा अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.याप्रसंगी बोलताना भोजापुर पूर चारी संघर्ष समितीचे अध्यक्ष पांडुरंग फड,सोनोशी गावचे उपसरपंच राजेंद्र सानप,लाभधारक क्षेत्रातील शेतकरी जयहरी सानप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.यावेळी भोजपुर पूर चारी संघर्ष समितीचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या भोजापुर पूर चारी पाणी जरी सुटले असले तरी यात विखे व थोरात यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.पाणी कोणीही सोडूदया मात्र लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांचं भलं व्हावं हीच सदिच्छा..