
अहमदनगर (दि.११ऑक्टोबर):-मुलगी वयात येण्याआधी तिच आयुष्य सुरळीत चाललेलं असतं.मनमुराद,मोकळ अगदी जणू फुलपाखरासारख पण तेवढ्यातच तिच्या आयुष्यात एक नवीन वळण येत.जेमतेम बारा वर्षाची झाल्यानंतर मासिक पाळीला सुरुवात होते.आणि एकीकडे तिला मासिक पाळी आल्यामुळे बंधनात ठेवायला सुरुवात होते.प्रत्येक गोष्टीसाठी रोकटोक सुरू होते.कुठे जाण्या येण्यासाठी सुद्धा परवानगी मागितल्याशिवाय बाहेर पडता येत नाही.
आणि परवानगी नाही मिळाली तर अशीच इच्छा मारावी लागतात.काही जणांचा असा समज आहे की मासिक पाळी आली म्हणजे मुलगी मोठी झाली तिच्यावर सर्व जबाबदाऱ्या टाकल्या जातात.आणि सर्व जबाबदाऱ्या टाकल्या की ती बरोबर सांभाळेल मग तिची इच्छा असो किंवा नसो. महत्त्वाच म्हणजे जेव्हा आपण आपल्या डोळ्यासमोर काही अशा गोष्टी घडताना बघतो तेव्हा ती गोष्ट घडताना किंवा घडून गेली आहे हे समजल्यावर आश्चर्याचा धक्काच बसतो.सोबतच तीव्र दुःखाच्या वेदना सुरू होतात विचारांचा अथांग सागर मनामध्ये तयार होतो आणि काही मुलींना तर मासिक पाळी आली की तिच शिक्षण बंद केले जात.आणि लगेचच घरातील काम शिकवायला सुरुवात होते.
घरातील काम पूर्ण शिकून झाली की मग शुभमंगल सावधान लगेचच लग्न उरकून टाकतात.थोडफार सुशिक्षित घराणं असलं की त्या घरातील मुलींना जास्तीत जास्त दहावी बारावी पर्यंत शिक्षण शिकण्याची परवानगी असते.मुलींना प्रत्येक गोष्टीत ॲडजस्टमेंट करावी लागते. लोकांच्या मनाप्रमाणे जगाव लागते.लग्न आधी आई-वडील,भाऊ-बहिणी, यांचा विचार करून स्वतःच्या इच्छांना मारावे लागते आणि लग्न झाल्यानंतर पती, सासू-सासरे,नंदन,भाया-दीर, मुलं-मुली यांचा विचार करावा लागतो.स्त्री ही स्वतःच अस्तित्व विसरूनच जाते. मुलींच्या इच्छेविरुद्ध लग्न केले जाते.त्यांची मानहानी,पिळवणूक केली जाते.नवीन पंख फुटण्या आधीच त्यांना कापून जाळलं जातं.पैंजणाच्या नावावर पायात बेड्या टाकल्या जातात,मंगळसूत्राच्या नावावर गळ्यात फाशीचा फंदा टाकला जातो,हातात बांगड्याच्या नावावर बेड्या टाकून हात बांधले जातात, भाळी कुंकू लावून तिच्या नशिबाचा वाटोळ करतात.मानसिक शारीरिक त्रास दिला जातो.काही मुलींना तर हुंड्या पायी छळलं जातं मारलं जातं.
पण मुलगी हा त्रास सहन करतात. कारण त्यांना त्यांच्या आई-वडिलांची काळजी असते. म्हणून आई-वडिलांचा विचार करून त्यांच्या प्रेमापोटी मुली लग्नाला होकार देतात.काही मुली बालविवाहाला बळी पडतात.शिक्षणाची वही,पेन, पाटी, पुस्तकाची जागा मुलं बाळ घेतात. सरकार पण याकडे दुर्लक्ष करतं. नुसताच बेटी बचाव बेटी पढाव हा नारा असतो. आयुष्य थोडंच असावं पण बंधनात नसावं असं प्रत्येक मुलीला वाटतं. मोजक्याच मुलींना आयुष्यात फ्रीडम लाभतं. मुली मान्य नसलेल्या लग्नाच्या चक्रव्यूहात पडतात. लग्न झाल्यावर मुलींना साधी साडी सांभाळता येत नाही आणि संपूर्ण घरातील जबाबदाऱ्या कशा सांभाळतील. थोडं जरी काही चुकलं तर लगेचच तुझ्या आईने काय शिकवलं हे शब्द ऐकायला मिळतात.आणि बोलता न येणाऱ्या शब्दांचे दुःख खूप जास्त झालेलं असतं.मुलींच्या शिक्षणाला लग्नाच कुलूप लावतात.
प्रविण कदम,समन्वयक,उडान बालविवाह प्रतिबंधक अभियान,अहमदनगर