
श्रीरामपूर(ॲड.प्रशांत राशिनकर):-श्रीरामपूर तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा नायगाव जुने शाळेत भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणादिन उत्साहात संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात माजी राष्ट्रपती,थोर शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघमोडे व शिक्षिका सुजाता सोळसे यांनी वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिनाचे महत्त्व सांगितले.शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम व वाचन प्रेरणादिन यावर मनोगते व्यक्त केली.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त गावामध्ये वाचन चळवळ सुरू करून शाळेतील ग्रंथालयाच्या पुस्तकात भर पडण्यासाठी ग्रामस्थ व पालकांनी वाढदिवस,लग्नसमारंभ, वर्षश्राद्ध अशा कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेस पुस्तके भेट द्यावीत असे आवाहन शिक्षकांनी केले.त्याच प्रमाणे शाळेत जागतिक हात धुवा दिन या निमित्त विद्यार्थ्यांना हात धुण्याचे योग्य प्रात्यक्षिक दाखवून हात धुण्याचे महत्त्व सांगण्यात आले.वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन एक दिवसापुरतेच त्यांचे महत्व न राहता दैनंदिन जीवनात त्याचा सातत्याने उपयोग होणे गरजेचे आहे.त्या दृष्टीने शाळेतील शिक्षकांनी जीवनमूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा चांगला प्रयत्न यानिमित्ताने झाला.सार्थक वाचन प्रेरणा-औचित्य वाचन प्रेरणा दिनाचे ..पण सुरुवात एका वैचारिक वाचन चळवळीची.कारण यावर्षी शाळेतील शिक्षकांनी मुलांना छोटी छोटी पुस्तके अगोदरच दहा दिवस वाचण्यास दिली होती.मुलांनीही प्रामाणिकपणे वाचून महत्वाचे मुद्दे भाषणात सांगितले …आणि विशेष म्हणजे प्रत्येकाने आवर्जून स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत माहिती दिली.यामुळे शाळेतील शिक्षकांना खूप समाधान वाटले.मुले बुध्दीने समग्र होणे हे देश हिताचे आहे.कारण स्वतंत्र विचार घेऊन उन्नत होणारी पिढी निर्माण होणे ही काळाची गरज आहे.हे यानिमित्ताने स्पष्ट होते.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष राशिनकर,ज्येष्ठ नागरिक संपतनाना लांडे,इंदूबाई लांडे व सर्व शिक्षक उपस्थित होते.