अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी पगाराविना
अहमदनगर (दि.१६ नोव्हेंबर):-अहमदनगर महानगरपालिकेत पगारासह सानुग्रह अनुदान देण्याचे ठरले असतांनाही प्रशासनाकडून मात्र कसेबसे सानुग्रह अनुदान देण्यात आले असून पगार मात्र प्रशासनाला कामगारांना देता आला नाही.
त्यामुळे अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांना यंदाची दिवाळी पगाराविनाच साजरी करावी लागली.तसेच अडीच हजार सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनपासून वंचित राहिले आहेत.शासनाकडून जीएसटीपोटी मिळणारे अनुदान न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचा पगार व पेन्शनचा प्रश्न निर्माण झाला आहे.महापालिकेत सुमारे एक हजार 700 कर्मचारी काम करतात.शहराला दैनंदिन सेवा पुरविण्याचे काम ते करतात.दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना महापालिका कर्मचाऱ्यांना काटकसर करूनच हा सण साजरा करावा लागला.कर्मचाऱ्यांचे पगार महिन्याच्या दहा तारखेला होतात.
या महिन्यात मात्र दहा तारीख उलटली तरी त्यांचे पगार झाले नाहीत. त्यात दिवाळीचा सण 12 तारखेला असतानाही त्यांच्या हातात पगार आला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना आहे.अनेकांवर उसनवारीची तर काहींवर थेट व्याजाने पैसे घेण्याची वेळी आली आहे. पेन्शनधारकांची देखील तशीच परिस्थिती आहे. पेन्शन न मिळाल्याने या पेन्शनधारकांची दिवाळी देखील काटकसरीतच साजरी झाली. महानगरपालिका प्रशासनाने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अगोदरच निधीची तरतूद करणे आवश्यक होते. परंतु तसे न झाल्याने कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत झाले नाहीत. त्यामुळे कर्मचारी संताप व्यक्त करत आहेत.महापालिकेला शासनाकडून जीएसटीपोटी दरमहा दहा कोटी रूपयांचे अनुदान मिळते. या अनुदानाच्या रक्कमेतूनच कर्मचाऱ्यांचे पगार होतात. अनुदान वगळता कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन देण्यासाठी महापालिकेकडे उत्पन्नाचे दुसरे कोणताही पर्याय नाही.
त्यामुळे शासन जेव्हा जीएसटीचे अनुदान देईल, तेव्हाच कर्मचाऱ्यांचे पगार होतील. सध्या तरी सुट्ट्या पाहता अनुदान जमा होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे आता 15 तारखेनंतर अनुदान उपलब्ध होण्याची शक्यता आहे.कंपनीचे कामगार, खासगी आस्थापनांना दिवाळीसोबत बोनस मिळाला असताना मनपा कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नसल्याने त्यांची दिवाळी अंधारात गेली आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांत नाराजीचे वातावरण आहे.