
संगमनेर प्रतिनिधी(राजेंद्र मेढे):-मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बुधवार २२ नोव्हेंबर रोजी संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर होणाऱ्या विराट सभेची तयारी पूर्ण झाली आहे.

तालुक्याच्या चारही बाजूने येणाऱ्या मराठा समाज बांधवांच्या वाहन पार्किंगची ही व्यवस्था सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

एकच ध्यास मराठा आरक्षण. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या एकमुखी मागणीसाठी मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.मराठा समाजात जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी आपल्या दुसऱ्या टप्प्यातील संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. शिवस्मृतिदिनानिमित्ताने पट्टाकिल्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून जरांगे पाटील हे बुधवारी दुपारी ३ वाजता संगमनेरात दाखल होणार आहेत.
त्यांचे जंगी स्वागत करण्याची तयारी संगमनेर शहर आणि तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तयारी पूर्ण झाली आहे.
संगमनेर तालुक्याच्या पश्चिम भागा कडून येणाऱ्या मराठा समाज बांधवांच्या पार्किंगची व्यवस्था मेडिकव्हर हॉस्पिटलच्या पश्चिमेस नवले यांचा प्लॉट,श्रमिक मंगल कार्यालय,शारदा विद्यालय अकोले नाका व इंदिरानगरमधील प्रांत निवासस्थानासमोरील प्रांगणात केली आहे. पूर्वभागाकडून येणाऱ्या समाज बांधवांसाठी ज्ञानमाता विद्यालय,पावबाकी रोड, सातपुते नगर,पोतदार शाळेजवळ,आशिष गार्डन तसेच उत्तर भागातून येणाऱ्या समाज बांधवां साठी मार्केट यार्ड पटांगण,शेतकी संघ पटांगण,मालपाणी लॉन्स पटांगण,राजेंद्र होंडाच्या पाठीमागे महावितरणचे पटांगण,दक्षिण भागातून येणाऱ्या समाज बांधवां साठी संगमनेर खुर्द येथील शोएब पठाण यांचा प्रवरा सर्विस स्टेशनजवळ मोकळा प्लॉट आणि ज्ञानमाता विद्यालय आशा ४ ही बाजूने येणाऱ्या मराठा समाज बांधवांच्या वाहनांच्या पार्किंगची सकल मराठा समाजाच्या वतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे.
त्यामुळे सर्व बांधवांनी नेमून दिलेल्या ठिकाणीच आपली वाहने लावावी असे आवाहनही करण्यात आले आहे. तरी या सभेसाठी संगमनेर तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संगमनेर शहर आणि तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.