
अहमदनगर (दि.१५जानेवारी):-मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणी करता मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे हे २६ जानेवारी रोजी आमरण उपोषणाला बसणार आहेत.
ते २१ जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करणार असून पाथर्डी तालुक्यातील तनपुरेवाडी येथे दुपारचे भोजन घेणार आहे.तर रात्रीचा मुक्काम नगर पाथर्डी रोडवरील बाराबाभळी येथे होणार आहे.२२ जानेवारी रोजी सुपा मार्गे पुढे रांजणगाव येथे मुक्कामाला जाणार आहे.अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील सर्व बांधव पायी जाणाऱ्या दिंडीतील मराठा बांधवांची सेवा करणार आहेत.
जेवण,पाणी आणि लाईटची सोय करण्यासाठी विविध कमिट्या स्थापन करण्यात आल्या असून जिल्ह्यातील सर्वच मराठा बांधव बाहेर जिल्ह्यातून आलेल्या बांधवांची सेवा करण्यासाठी अहमदनगर मध्ये दाखल होणार आहेत.जवळपास पाच ते सहा लाख पाण्याच्या बॉटल तसेच पंचवीस लाखाच्या आसपास लोकांच्या जेवणाची सोय अहमदनगर जिल्ह्यातील मराठा बांधव करणार असून मराठा बांधवांसह इतर समाजातील बांधव या सेवेला प्रतिसाद देत असून जे बांधव पायी चालणार आहेत त्यांना त्रास झाला तर औषध उपचारासाठी अहमदनगर मेडिकल असोसिएशन तर्फे उपचार साहित्य देण्यात येणार आहे अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांनी दिली आहे.
तर माजी नगरसेवक धनंजय जाधव हे सुद्धा मराठा बांधवांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार आहेत. जिल्ह्यातील मराठा समाजातील जे मोठे उद्योजक,खाजगी कंपन्यांचे मालक,इंजिनियर व दानशुर व्यक्ती आहेत त्यांनी आपापल्या परीने आरक्षणासाठी निघालेल्या पायी दिंडीतील लोकांना मदत करावी असे आवाहन गोरख दळवी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केले आहे.यावेळी गोरख दळवी,राम जरांगे,मदन आढाव,गजेंद्र दांगट,आदींसह मराठा समाजाचे कार्यकर्ते या पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.