
अहमदनगर (दि.१७ जानेवारी):-१५ जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी तरुणावर चाकूने वार करून खून करण्याची घटना ताजी असतानाच,आता अजून एक खुनाची घटना एमआयडीसी हद्दीतील देहरे परिसरात घडली आहे.
यात अल्पवयीन मुलीच्या पाठीमागून वार करून तिला विहिरीत ढकलून देऊन खून करण्यात आला असल्याचे पीडित मुलीच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.देहरे परिसरातील अल्पवयीन मुलगी १३ जानेवारीपासून बेपत्ता होती तिचा मृतदेह हा एका विहिरीत आढळून आला,गोटया उर्फ ऋत्विक संजय जाधव याने या मुलीची लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्याने व एक अल्पवयीन मुलगी यांनी पीडित मुलीला हत्याराच्या साहाय्याने मारून विहिरीत ढकलून दिले.
पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या जबाबावरून पूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात खुनाच्या कलमाची वाढ करून या दोघांना आरोपी करण्यात आले आहे.एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवार दि.१६ जानेवारी रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय सानप यांची नुकतीच नाशिकला बदली झाली असल्याने बदलून येणाऱ्या नवीन अधिकाऱ्याला आता एक प्रकारे आव्हानच निर्माण झाले असून गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात लक्ष घालण्याची गरज असल्याचे नागरिकांनी खाजगीत चर्चा करताना म्हटले आहे.