
अहमदनगर (दि.२६ जानेवारी):-देशाच्या प्रगतीचा रथ सर्वसामान्य व्यक्तींच्या योगदानामुळेच पुढे जात आहे.समाजातील शेवटच्या घटकाचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी सामाजिक सुरक्षेचे योजनारुपी कवच तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनामार्फत यशस्वी प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री.विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सलीमठ,जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,महानगरपालिकचे आयुक्त डॉ.पंकज जावळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
युवकांच्या रोजगाराच्या दृष्टीने अहमदनगर व शिर्डी येथे औद्योगिक वसाहत उभारणीसाठी जागा हस्तांतरित करण्यात आली आहे.या वसाहती रोजगार उपलब्धतेसाठी महत्त्वपूर्ण ठरतील असा विश्वासही पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी शहीद जवानांच्या वीरपत्नी, कुटूंबियांना मदतीचा धनादेश, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा पारितोषिक वितरण,महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाच्या जिल्हास्तरीय विजेत्यांचा सन्मान, महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांचा सन्मानही पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरणीकरण केले. तसेच पोलीस विभागामार्फत रेस्क्यु ऑपरेशनचे प्रात्यक्षिकही यावेळी सादर करण्यात आले.
तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी परेडचे निरीक्षण केले. परेडमध्ये पोलीस दल, महिला पोलीस दल, बँडपथक, अग्निशामक दल, एनसीसी, आरएसपी, स्काऊट गाईड आदींनी सहभाग घेतला.यावेळी पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छाही दिल्या.कार्यक्रमास पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांच्यासह शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.