
अहमदनगर (दि.२७ जानेवारी):-बालविवाहांचे प्रमाण भारतात ४७,तर महाराष्ट्रात ३५ टक्के आहे. बालविवाहांमुळे मातामृत्यू, गर्भपात,कुपोषित अर्भके,याच बरोबर स्त्रीशिक्षण आणि स्त्रीसक्षमीकरणा संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न निर्माण होत आहेत.अत्याचाराला बळी पडणाऱ्यांमध्ये बालविवाह झालेल्या मुलींचे प्रमाण खूप मोठे आहे.
शिक्षण आणि आरोग्याचे उद्दिष्ट जर १०० टक्के साध्य करायचे असेल, तर बालविवाहाचे प्रमाण शून्य टक्के करण्यासाठी उडान प्रकल्प प्रयत्नशील आहे. यासंर्भात काढण्यात आलेल्या बालविवाह जागृती सायकल यात्रेचा समारोप स्नेहालयमध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी झाला.१६ जानेवारीला राष्ट्रीय युवा सप्ताहात सायकल यात्रेला प्रारंभ झाला.उडान आणि युवा निर्माण प्रकल्पाने काढलेली ७०० किलोमीटरची ही सायकल यात्रा पाथर्डी,शेवगाव,नेवासे, श्रीरामपूर,कोपरगाव,राहाता, अकोले,संगमनेर,राहुरी, सोनई,शनी शिंगणापूरमार्गे नगरला परत आली. वेगवेगळ्या गावांत बालविवाहमुक्त भारत, मानवाधिकार युक्त भारत हा संदेश यात्रेने दिला.
शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये,ग्रामपंचायत, एनएसएस कॅम्प,साखर कारखाने येथे जाऊन बालकांचे हक्क,बेटी बचाओ बेटी पढाओ,मुलीचे जन्माचे स्वागत करा याविषयी जनजागृती करण्यात आली.समारोपप्रसंगी डॉ.सुधा कांकरिया यांनी सायकल यात्रींचे कौतुक केले. प्रास्ताविक उडानच्या मानद संचालक ॲड.बागेश्री जरंडीकर यांनी केले.उडानचे प्रकल्प व्यवस्थापक व यात्रेचे समन्वयक प्रवीण कदम यांनी यात्रेतील अनुभव सांगितले.या यात्रेत राजमुद्रा करिअर अकॅडमी,स्नेहालय, बालभवन आणि महाविद्यालयामधील तरूणाईचा सहभाग होता.यात्रेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून नितीन खाडे,राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या संचलिका नंदा पांडुळे,रोटरी क्लबचे अध्यक्ष माधवराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
स्नेहालयाचे विश्वस्त राजीव गुजर यांनी आभार मानले.सुनील महाजन यांनी गायलेल्या गीताने समारोप झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली वाघमारे यांनी केले.स्नेहालयाचे संचालक हनिफ शेख,रोटरीचे सचिव दीपक गुजराती,डॉ. अंशू मुळे,मनीषा गुगळे, वैशाली चोपडा,शबाना शेख, नीलेश वैकर आदी यावेळी उपस्थित होते.