अहमदनगर पोलीस दलास उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाहनांचा उपयोग जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी व्हावा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अहमदनगर (दि.२२ फेब्रुवारी):-जिल्ह्यातील पोलीस दलाच्या सक्षमीकरणावर सातत्याने भर देण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलास उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाहनांचा उपयोग जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ४ कोटी ६० लक्ष रुपयातून खरेदी करण्यात आलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांचे पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर लोकार्पण करण्यात आले.त्याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते.
यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, पोलीस दलामध्ये वाहनांची कमतरता होती. पोलीस दलाची अनेक दिवसांची मागणी या निमित्ताने आज पूर्ण होत आहे. पोलीस दलास जिल्हा नियोजन समितीमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहने उपलब्ध करून देणारा आपला जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. दिलेल्या वाहनांचा उपयोग सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी व्हावा. पोलिसांनी जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे पोलिसिंग करत जिल्हयातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. चोरीच्या गुन्ह्यातील हस्तगत केलेल्या वस्तू तक्रारदारांना अगदी सहजपणे मिळतील अशी पद्धती पोलिसांनी विकसित करावी, अशी अपेक्षाही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रास्ताविकात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले की, विस्ताराने अहमदनगर जिल्हा हा खूप मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यात ३३ पोलिस स्टेशन कार्यरत आहेत. पोलीस दलास वाहनांची अत्यंत कमतरता होती. परंतु पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने पोलीस दलासाठी ४ कोटी ६० लक्ष रुपये खर्चून ४६ चारचाकी व ४३ दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना वाहनांच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या. तसेच चोरीच्या गुन्ह्यातील हस्तगत केलेल्या वस्तूही तक्रारदारांना देण्यात आल्या.कार्यक्रमास पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांची उपस्थिती होती.