
अहमदनगर (दि.९ मार्च):-सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यक्तीने सायबर साक्षर होणे आवश्यक असून ती आता काळाची गरज झाली आहे असे प्रतिपादन सायबर विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्री.राहुल सानप यांनी केले.
अहमदनगर येथील इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (आय.एस.डी.टी.) या संस्थेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या “संवाद” या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून श्री.सानप बोलत होते.यावेळी संस्थेचे संस्थापक श्री.विनायकराव देशमुख संचालिका पूजा देशमुख, प्राचार्य आर्कि. अरुण गावडे, सायबर सेलचे अरुण सांगळे, महेश बालटे, शिरीष गावडे, प्रणव भोसले, मेघा आसने, पुजा पतंगे, पुजा धट, स्मिता बडाख, कोमल बीडकर, सानिका बार्शीकर, रोहन चारगुंडी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक श्री. राहुल सानप म्हणाले,”सध्या मोबाईलचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला असून तो आता बहुसंख्य व्यक्तींच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. परंतु मोबाईल वापरा संबंधीच्या अपुऱ्या ज्ञानामुळे आर्थिक गुन्ह्यांचे आणि फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सायबर साक्षर होणे अत्यंत आवश्यक आहे. मोबाईलचा आणि त्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर करताना आपली व्यक्तिगत माहिती, आपल्याला येणारा ओ.टी.पी., आपण समाज माध्यमांवर टाकत असलेले फोटो आणि अद्यावत माहिती याबाबत दक्ष राहणे अत्यंत आवश्यक आहे. सायबर गुन्ह्यांच्या माध्यमातून आपली फसवणूक होणार नाही यासाठी काही बंधने स्वतःवर घालणे आवश्यक आहे. याबाबत प्रत्येक व्यक्तीने योग्य ती खबरदारी घेतल्यास सायबर गुन्हेगारी पासून आपण स्वतःचे संरक्षण निश्चितपणे करू शकतो.
याप्रसंगी श्री.राहुल सानप व श्री. अरुण सांगळे यांनी सायबर साक्षरता याबाबत पीपीटीद्वारे सादरीकरण केले.प्रारंभी संस्थेचे संस्थापक श्री. विनायकराव देशमुख यांनी प्रास्ताविक करुन “संवाद” कार्यक्रमाचा उद्देश विशद केला.संचालीका पुजा देशमुख यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री मोहळ व कविता चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन निकिता मसुरे हिने केले.