Maharashtra247

पाथर्डी शहराच्या उत्तरेकडील भागाचे आदर्शनगर नामकरण परिसरातील नागरिकांच्या प्रयत्नांना यश

पाथर्डी प्रतिनिधी (विठ्ठल आंधळे):-पाथर्डी शहराचा झपाट्याने विस्तार होत असल्याने विविध उपनगरातील रहिवाशांना राहण्याच्या ठिकाणाची माहिती शासकिय कार्यालय व इतर ठिकाणी देताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

या समस्येचे निराकरण करण्यासाठी परिसरातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन नगरपरिषदेच्या परवानगीने लोकसहभागातून पाथर्डी-शेवगाव रस्त्यावरील गांधी हॉस्पिटल समोरील भागास आदर्शनगर असे नामकरण करण्याचे सर्वांनुमते ठरविले.यासाठी नुकतेच कार्यक्रमाचे आयोजन येथील नागरिकांच्या वतीने करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड,माजी उपनगराध्यक्ष बजरंग घोडके,माजी नगरसेवक रमेश गोरे,माजी नगरसेविका मंगलताई कोकाटे,माजी प.स.सदस्य विष्णुपंत पवार,युवा सेनेचे सचिन नागापुरे  इ.मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभयकाका आव्हाड हे होते.आपल्या भाषणात त्यांनी या परिसरातील नागरीकांच्या एकजुटीचे भरभरून कौतुक केले.

या परिसरावर विकास कामाच्या बाबतीत अन्याय झालेला आहे याची कबुलीही त्यांनी यावेळी दिली.या अन्यायाची भर येत्या काळात नक्कीच काढण्यात येईल,तसेच या परिसराचा विकास करण्यासाठी बराच वाव असल्याने मोठ्या शहराच्या धर्तीवर विकास आराखड्यानुसार नवनवीन उपक्रम राबवण्याबरोबरच रस्ते,पाणी व वीज या मुलभूत समस्याही सोडवण्यात येतील अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

नागरिकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना ठकसेन तुपे यांनी ऐन दिवाळीच्या हंगामात आम्ही पुकारलेले धरणे आंदोलन मागे घ्यावे,रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करु असे लेखी आश्वासन नगरपरिषदेने देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने तिव्र नाराजी व्यक्त केली.आमचे न्याय,हक्क व अधिकार आम्हांला मिळत नसतील,आमचे मूलभूत प्रश्नच जर सुटत नसतील तर या संदर्भात लवकरच आम्ही ग्राहक मंचात जाऊ असा इशाराही त्यांनी दिला.या कार्यक्रमाचा शुभारंभ पाथर्डी-शेवगाव रस्त्यावरील फलक व आदर्शनगर येथील मुख्य चौकातील फलकाचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करुन झाले.

मंगलताई कोकाटे तसेच या परिसरातील सर्व महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष आंधळे,प्रास्तविक व अध्यक्षिय निवड शिवाजी बडे तसेच कार्यक्रमाचे आभार सुधीर सुडके यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी या परिसरातील सर्व नागरिक,महिला भगिनी व अबाल वृद्धांनी विशेष परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page