हिवरगाव पावसा येथील देवगड परिसरातील वृक्षसंवर्धनाचा पॅटर्न ठरेल प्रेरणादायी
संगमनेर (नितीन भालेराव):-हिवरगाव पावसा येथील संविधान प्रेमी वृक्षमित्र प्रा.गणपत पावसे सर हे समाज प्रबोधन व वृक्षसंवर्धनाचे काम करतात.
छ.शिवाजी महाराज,महात्मा फुले,छ.शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्याची प्रेरणा घेवून ३४ वर्षे त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले.शिक्षण क्षेत्रात कार्य करताना वृक्षसंवर्धन व जोपासनेचे कार्य हाती घेतले आहे.वाढदिवसा निमित्त, विवाह,दशक्रिया विधी,जलदान विधी,विविध कार्यक्रमा निमित्त वृक्ष भेट देऊन समाजात वृक्ष लागवड चळवळ गतिमान केली. वृक्षमित्र प्रा.गणपत पावसे सर यांनी हिवरगाव पावसा येथील देवगड परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड,वृक्षसंवर्धन उपक्रम राबविला.हिवरगाव पावसा येथील खंडोबा देवगड परिसराची शोभा वाढली आहे.
त्यामुळे देवगड परिसरातील वृक्षसंवर्धनाचा पॅटर्न समाजासाठी आदर्श व प्रेरणा देत आहे.समाजात वृक्ष लागवड चळवळ गतिमान करताना कोणतीही सामाजिक,शासकीय मदत न घेता स्व खर्चातून कार्य करतात.श्री.हनुमान विद्यालय पिंपळगाव देपा,ता.संगमनेर,जि.अ.नगर येथे मुख्याध्यापक म्हणून ३४ वर्षे शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे करताना विद्यार्थ्यान मार्फत वृक्ष लागवड,वृक्षसंवर्धन उपक्रम राबविला.पिंपळगाव देपा या गावात जवळपास सुमारे चार हजार वृक्षांची लागवड करून जोपासना केली आहे.प्रत्येक विद्यार्थाला वर्षभरात घराच्या परिसरात दहा झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी दिली.वर्षाच्या शेवटी परीक्षेच्या आधी शिक्षक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन तपासणी करून अहवाल सदर करत.उत्कृष्टरित्या वृक्षांची लागवड करून जोपासना करणाऱ्या विद्यार्थ्याला बाल वृक्षमित्र पुरस्कार दिला जात असे.अशा प्रकारे श्री.हनुमान विद्यालयातील विद्यार्थ्यान मार्फत पिंपळगाव देपा येथे जवळपास सुमारे चार हजार व वृक्षांची लागवड करून जोपासना केली आहे.
पिंपळगाव देपा येथे ओसाड माळरानावर रणरणत्या उन्हात थंडगार सावली देणारे वृक्ष आज दिमाखात उभे आहेत आणि प्रा.गणपत पावसे यांच्या कार्याची साक्ष देत आहे.वृक्षमित्र प्रा.गणपत पावसे सर यांनी हिवरगाव पावसा येथील देवगड परिसरात तसेच हिवरगाव पावसा गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड,वृक्षसंवर्धन उपक्रम राबविला आहे.ते देवगडच्या परिसरात सन २००३ पासून वृक्ष लागवड,वृक्षसंवर्धन उपक्रम राबवत आहे.त्यांनी देवगडच्या पहिल्या पायरी पासून ते गडाच्या माथ्या पर्यंत व परिसरात सुमारे तीनशे वृक्षांची लागवड करून जोपासना केली आहे.सन २००७-०८ मध्ये दंडकारण्य अभियाना अंतर्गत गड दत्तक घेण्यात आला व राजहंस दुध संघाने त्यांच्या कार्याला पाठबळ दिले.तसेच राजहंस दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दुध संघाने गडाच्या आजूबाजूला अनेक वृक्षांची लागवड करून ठिबक सिंचन केले आणि संपूर्ण देवगडच्या परिसराला लोखंडी जाळीचे कुंपण करण्यात आले आहे.त्यामुळे वृक्षसंवर्धनास मोठी मदत झाली आहे.
सद्यस्थिती देवगडच्या परिसरात सुमारे दहा हजार वृक्ष गडाची शोभा वाढवत आहे.गडाच्या पाय-यांन लगत वृक्षमित्र प्रा.गणपत पावसे सर यांनी लावलेली मोठी सावली देणारे वृक्ष भाविकांचे आणि पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.तसेच छ.शिवाजी महाराज,महात्मा फुले,छ.शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्याची प्रेरणा घेवून प्रा.गणपत पावसे विविध कार्यक्रमातून समाज प्रबोधन करतात.महापुरुषांनी केलेल्या कार्याची,त्यागाची माहिती देतात.तसेच समाजातील अनिष्ठ रूढी,परंपरा यातून समाज बाहेर यावा यासाठी जनजागृती करतात.बौध्द,हिंदू,मुस्लीम,ख्रिचन सर्व धर्मांच्या कार्यक्रमातून संविधानातील स्वतंत्र,समता,बंधुता,न्याय या तत्वाचा प्रचार प्रसार करतात.त्यामुळे हिवरगाव पावसा या गावात सामाजिक समता,बंधुभाव,सामाजिक ऐक्य,सामाजिक सलोखा वृद्धिंगत होत आहे.
विविध कार्यक्रमातून संविधान प्रेमी,वृक्षमित्र प्रा.गणपत पावसे सर हे संविधानाचे महत्व समजून सांगतात.तसेच समाजाने अज्ञान सोडून विज्ञान स्वीकारले पाहिजे असे ते सांगतात.म्हणून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशा ध्येयवादी वृक्षमित्र प्रा.गणपत पावसे सरांचे कार्य लोकचळवळ बनावी हि अपेक्षा आहे.