शेवगाव तालुक्यातुन अपहरण झालेल्या ३ मुलींची सुटका,आरोपी पोपट स्थानिक गुन्हे शाखेच्या पिंजऱ्यात
अहमदनगर (दि.२८ एप्रिल):-शेवगांव तालुक्यामधुन तक्रारदार यांच्या दोन मुली वय – 12 वर्षे व वय 10 वर्षे, तसेच तक्रारदार यांचे गावातील एक अल्पवयीन मुलगी अशांना आरोपी नामे पोपट्या उर्फ पोपट शहादेव बोरुडे याने दि. 19 एप्रिल रोजी त्यांना कशाचे तरी आमिष दाखवुन पळवुन नेले होते.या घटनेबाबत शेवगांव पोलीस ठाणे गु.र.नं.361/2024 भादवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.दिनेश आहेर यांना आरोपीचा शोध घेवुन अपहरण झालेल्या मुलींची सुटका करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि.श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील वेगवेगळे दोन पथके तयार करुन आरोपीचा शोध घेवुन अपहरण झालेल्या मुलींची माहिती काढणेकामी पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.पोलीस पथकाने गुन्हा घडल्यापासुन शेवगांव शहरातील व शेवगांव ते अहमदनगर जाणारे रोडवरील आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही.फुटेज चेक केले असता सदर आरोपी हा तीन मुलींना मोटारसायकवर घेवुन जातांना शेवगांव ते अहमदनगर जाणारे रोडवरील मराठवाडी पर्यंत दिसुन आला होता.
वरील दोन्ही पथकांनी पुणे,मुंबई,धाराशिव, बीड,जालना,परभणी, छ. संभाजीनगर,पिंपरी चिंचवड या जिल्ह्यामध्ये जावुन आरोपीचे मित्र, नातेवाईक यांचा शोध घेवुन त्यांचे कडे आरोपी व अपहरण झालेल्या मुलींबाबत माहिती घेण्यात आली होती. तसेच वेगवेगळ्या 200 ते 300 ठिकाणचे सी.सी.टी.व्ही.फुटेज व आरोपीचे राहते घरी तसेच अपहरण झालेल्या मुलींचे घराचे आजुबाजुचे तांत्रिक विश्लेषणाचे आधारे माहिती घेण्यात आली होती.पोलीस पथके आरोपीची माहिती काढत असतांना दि.28 एप्रिल रोजी सुपा परिसरातील एका महिलेने पोनि.श्री.दिनेश आहेर यांना फोनवरुन तीन मुली व एक मुलगा सुपा परिसरामध्ये असल्याची माहिती दिली.पोनि.श्री.दिनेश आहेर यांनी तात्काळ पथकास मिळालेली माहिती कळवुन तीन मुली व त्यांचे सोबत असलेल्या मुलाचा शोध घेणेबाबत आदेश दिले. पथकाने सुपा परिसरामध्ये जावुन बातमीतील तीन मुलींचा व त्यांचे सोबत असलेल्या मुलाचा शोध घेत असतांना ते मिळुन आल्याने सदर तीन अल्पवयीन मुली व मुलास ताब्यात घेवुन मुलास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव पोपट उर्फ पोपट्या शहादेव बोरुडे असे असल्याचे सांगितले.ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन 03 मुली व आरोपी यास पुढील तपासकामी शेवगांव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास शेवगांव पोलीस ठाणे हे करीत आहे.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री. सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव, सोपान गोरे,पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे,रविंद्र कर्डीले, सचिन अडबल,संदीप चव्हाण,फुरकान शेख, संतोष खैरे,प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे,संभाजी कोतकर,भरत बुधवंत, विजय धनेधर,महिला पोलीस अंमलदार छाया माळी पोलीस यांनी केली आहे.