Maharashtra247

चाकुचा धाक दाखवून दरोडा टाकणारा सोन्याच्या दागिन्यासह पकडला स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

अहमदनगर (दि.१ मे):-नगर तालुक्यातील वाळुंज येथील दरोड्या प्रकरणी सोन्याचे दागिन्यासह सराईत आरोपी जेरबंद दोन गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,दि.११ नोव्हेंबर २०२३ रोजी घटनेतील फिर्यादी श्री.जनार्दन संभाजी हिंगे (रा.वाळुंज ता.नगर) यांच्या घराचा दरवाजा कोणीतरी अनोळखी ७-८ आरोपींनी तोडुन आत प्रवेश करुन फिर्यादी यांचे घरातील लहान मुलांना धरुन चाकुचा धाक दाखवला व घरातील ७ लाख ५ हजार/-रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले बाबत नगर तालुका पो.स्टे.गु.र.नं.851/23 भादविक 395 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हि घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर, यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन, गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न व अटक करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.आहेर यांनी घटना घडल्यापासुन स्थानिक गुन्हे शाखेतील २ पथके नेमुन अशा प्रकारचे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.पोलिस पथक नगर तालुका परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेताना पथकास वाळुंज शिवार,ता.नगर येथील चोरी ही आरोपी नामे प्रशांत चव्हाण (रा. चिचोंडी पाटील,ता.नगर) याने त्याचे इतर साथीदारांसह केला असुन तो चिचोंडी पाटील गावामधील स्टँडवर बसलेला आहे.आता गेल्यास मिळुन येईल अशी गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाल्याने पथकाने बातमीतील चिचोंडी पाटील गावातील एसटी स्टँड येथे जावुन शोध घेतला असता बातमीतील वर्णना प्रमाणे एक संशयीत इसम एसटी स्टँड परिसरात बसलेला दिसला.

पथकाची खात्री होताच त्यास शिताफीने ताब्यात घेवून पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रशांत घुमीर चव्हाण (रा. चिचोंडी पाटील,ता.नगर) असे सांगितले.त्याचे कडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने त्याचे साथीदार नामे लिमलेश देशपांड्या चव्हाण (फरार),ऋषीकेश दिगु भोसले (फरार), आयलाश्या जंगल्या भोसले (फरार) रा. आष्टी,जिल्हा बीड व गणेश दिवाणजी काळे (फरार) तिन्ही रा. वाकोडी,ता.नगर व लिमलेश चव्हाण याचे तीन अनोळखी साथीदारांनी मिळुन केल्याचे सांगितले.ताब्यातील आरोपी प्रशांत घुमीर चव्हाण याचे कडे इतर काही गुन्हे केले काय या बाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने इतर साथीदार लिमलेश देशपांड्या चव्हाण (फरार),ऋषीकेश दिगु भोसले दोन्ही रा.हिवरा पिंपरखेड,ता.आष्टी, जिल्हा बीड,आयलाश्या जंगल्या भोसले (फरार) रा.आष्टी,जिल्हा बीड अशांनी मिळुन नोव्हेंबर २०२४ रोजी मांडवे,ता. नगर येथील एका घराचे किचनचा दरवाजा तोडुन चोरी केल्याचे सांगितल्याने जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी केली असता नगर तालुका पो.स्टे.गु.र.नं. 851/23 भादविक 395 व 2) नगर तालुका पो.स्टे. गु.र.नं. 857/23 भादविक 457, 380 प्रमाणे 2 गंभीर गुन्हे दाखल असुन,2 गुन्हे उघडकिस आले आहेत.

आरोपीकडे गुन्ह्यात चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिने व रोख रकमे बाबत विचारपुस करता आरोपींने त्याच्या वाट्याला आलेले सोन्याचे दागिने हे त्याचे घराचे पाठीमागे असलेल्या शेतात पुरुन ठेवल्याचे सांगितले. पथकाने तात्काळ आरोपीचे चिंचोडी पाटील येथील घराचे पाठीमागे शेतात पुरुन ठेवलेले 35,000/- रुपये किंमतीचे 5 ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ,35,000/- रुपये किंमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी,35,000/- रुपये किंमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 21,000/- रुपये किंमतीचे 3 ग्रॅम वजनाची कानातले व 14,000/- रुपये किंमतीचे 2 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकुण 1,40,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो ताब्यात घेवुन आरोपीस मुद्देमालासह नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री. संपत भोसले पोलीस उपअधीक्षक नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे भाऊसाहेब काळे,रविंद्र कर्डीले, विश्वास बेरड,पंकज व्यवहारे,देवेंद्र शेलार, संतोष खैरे,संदीप दरंदले, फुरकान शेख,मच्छिंद्र बर्डे,आकाश काळे, रोहित येमुल,अमोल कोतकर,भाऊसाहेब काळे,संभाजी कोतकर, उमाकांत गावडे व अर्जुन बडे यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page