संगमनेर तालुक्यात बिबट्याची पुन्हा दहशत बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार
संगमनेर (दत्तात्रय घोलप):-संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथे वर्पे वस्तीवर कपडे धूत असताना महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.यामध्ये ४२ वर्षीय महिलेच्या मानेवर व डोक्यावर दात लागल्याने ती जागीच ठार झाली. बुधवारी (ता.११) सकाळी १०:३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
यामध्ये संगीता शिवाजी वर्पे (रा. निमगाव टेंभी,ता. संगमनेर) या मयत झाल्या.याच परिसरात एका विद्यार्थीनीवर बिबट्याने हल्ला केला होता.तर एक महिन्यापुर्वी दिड वर्षांच्या चिमुरडीचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.आज पुन्हा तशीच घटना घडल्याने संपूर्ण परिसर बिबट्यांच्या भितीने हादरून गेला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,निमगाव टेंभी गावात वर्पे वस्ती आहे.संगीता यांनी बुधवारी सकाळी गायांना चारा-पाणी केले. त्यानंतर स्वयंपाक करून मुलांना डबा करून दिला.
सर्वजण आपल्या आपल्या कामावर गेले.दरम्यान, घरातील सर्व कामे आवरून त्या कपडे धुण्यासाठी घराच्या समोर असलेल्या नळावर गेल्या.तेथे आजूबाजूला शेती आहे. झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात आहे. वस्तीच्या कडेला मका व गिनी गवताची शेती आहे.तेथेच हा बिबट्या दबा धरून बसला.बिबट्याने महिलेवर पाठीमागून हल्ला करत तिच्या डोक्याला धरून ओढीत गिनी गवतात नेले.हा सर्व प्रकार वस्तीवरील नागरिकांनी पाहिला. दरम्यान,वस्तीवरील माणसांनी आरडाओरड केली.गिनीगवत मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्याने आतमध्ये जाण्याची कोणाची हिंमत झाली नाही.
गिनी गवताचे बिबट्याचा व महिलेचा आवाज येत होता.त्यानंतर एका माणसाने ट्रॅक्टर घेतला व आवाजाच्या दिशेने गिनीगवतात नेला. त्यानंतर बिबट्यापासून या महिलेची सुटका केली.मात्र,तोपर्यंत ४२ वर्षीय महिलेने जीव सोडला होता.या महिलेला डॉक्टरांनी मयत घोषित केले.खरंतर,निमगाव टेंभी,देवगाव,हिवरगाव पावसा,रायते,पिंपरणे, जाखुरी,वाघापूर या भागात दिवसा देखील बिबटे दिसत आहे. त्यामुळे,वनविभागाने येथे जनजागृती करायला हवी,अशी मागणी होत आहे.