Maharashtra247

एकत्र या,सरकार कसे वाकत नाही हे मी पाहतो..!प्राथमिक शिक्षकांच्या मोर्चाला खा.नीलेश लंके यांचा पाठिंबा

 

नगर प्रतिनिधी:-मला तुमच्या संघटनांमध्ये राजकारण करायचे नाही.मात्र तुमच्या प्रश्‍नासाठी तुम्ही एकदिलाने एकत्र या.सरकार कसे वाकणार नाही हे आपण पाहू असा इशारा खासदार नीलेश लंके यांनी दिला.याच शिक्षकांमुळे राज्यात सरकार सत्तेत आले आहे.याच शिक्षकांमुळे क्रांती झाली असून त्यांच्यावर आंदोलनाची वेळ येत असेल,आपल्यात चार गट पडल्याने त्याचा कोणी राजकीय फायदा घेणार असेल तर यापुढील काळात आम्ही हे सहन करणार नाही असा इशाराही खा.लंके यांनी यावेळी बोलताना दिला.

अशैक्षणिक कामांना विरोध करण्यासाठी जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात सहभागी होउन खासदार नीलेश लंके यांनी शिक्षकांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवित सरकार तसेच प्रशासनास धारेवर धरले.यावेळी बोलताना खा.लंके म्हणाले,हा जगातला आगळा वेगळा मोर्चा आहे,आम्हाला न्यायदानाचे काम करू द्या,झोपडीतल्या गोरगरीब पोरांना शिकवू द्या या मागणीसाठी हा मोर्चा आहे.शिक्षकांना या मागणीसाठी मोर्चा काढावा लागतो ही या सरकारसाठी लाजिरवाणी गोष्ट असून महाराष्ट्रात हा काळा दिवस म्हणून पाळला गेला पाहिजे असा हल्लाबोल लंके यांनी यावेळी केला.

आमची पिढी कशी घडणार ?

माझ्या सर्वसामान्य घरातल्या पोरांना शिकविण्याचे काम करतो हा शिक्षक,त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर ही शरमेची बाब आहे.शिक्षकांना अशी कामे दिली तर आमची पिढी कशी घडणार आहे? आमची पिढी घडण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत बदल झाला पाहिजे.शिक्षक समाधानी नसेल तर पिढया कशा घडतील ? ज्यावेळी आम्ही शिक्षण घेत होतो,त्यावेळी शिक्षकांना ज्ञानदानाशिवाय दुसरे काही काम नसायचे. आज मात्र शिक्षकाला सर्वाधिक पिळविण्याचे काम केले जात आहे. या मोर्चापुढे मी खासदार म्हणून नव्हे तर तुमच्या कुटूंबातला एक सदस्य म्हणून उभा आहे.मी शिक्षकाचा मुलगा आहे. शिक्षकांचे दुःख काय , अडचणी काय आहेत हे मला माहीती आहे. तुमच्या कुटूंबातील एक सदस्य म्हणून मी तुमच्यासोबत आहे.वेळ प्रसंगी या प्रश्‍नावर माझे सरकार सत्तेत असले तरी मी तुमच्यासोबत असेल अशी ग्वाही खा. लंके यांनी यावेळी दिली. 

तर मी खासदार म्हणून राहू शकत नाही  

मी जर शिक्षकांना न्याय देऊ शकत नसेल तर माझ्यासारख्या शिक्षकाच्या मुलास खासदार म्हणून राहण्याचा अधिकार नाही. तुम्ही कुठलंही पाऊल उचला मी तुमच्यासोबत असणार आहे. तुम्हाला कोणी कायद्याचा धाक दाखविण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला कायदा दाखविण्याची ताकद नीलेश लंकेमध्ये असल्याचे लंके म्हणाले.

बदलीसाठी मागणी ही कोणती पध्दत   

बदलीमुळे एखाद्या भगिनीची गैरसोय होत असेल,ती जिल्हा परिषदेमध्ये न्याय मागण्यासाठी जात असेल त्यावेळी तीला चुकीच्या पध्दतीने वागणूक दिली जाते, एखाद्या विधवेची सोय करण्यापेक्षा तिची गैरसोय कशी होईल हे पाहिले जाते. बदलीसाठी वेगळया स्वरूपाची मागणी केली जाते, ही कोणती पध्दत ? असा सवाल खा.लंके यांनी केला.

You cannot copy content of this page