शेजाऱ्याचा खून करुन परराज्यात पळुन जात असलेल्या आरोपीस तोफखाना पोलिसांनी अवघ्या ४ तासात ठोकल्या बेड्या
अहमदनगर (दि.२ ऑक्टो):-शेजाऱ्याचा खून करुन छत्तीसगडला पळुन जात असलेल्या आरोपीस तोफखाना पोलिसांनी तपास करत अवघ्या ४ तासात अटक केली आहे. घटनेतील फिर्यादी श्री.हेमंत रमेश भरव्दाज,रा.छत्तीसगड हे त्याचे पत्नी,भाऊ, मामा यांचे सह अहमदनगर येथे एकत्र राहत असुन सुनिल ढवण यांचे विटभट्टीवर विट तयार करण्याचे कामास होते.त्यांचे शेजारी खोलीमध्ये अमन हरीचचंद्र सतनामी व मनीष ऊर्फ पुकु तिरीथ निशाद हे स्वतंत्र खोल्यांमध्ये रहावयास होते.दि.१ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास सुनिल ढवण यांच्या विटभट्टी जवळ, इसम नामे मनीष ऊर्फ पुकु तिरीथ निशाद हा मोठयाने शिवीगाळ करत असल्याने त्यास फिर्यादी यांचा आत्याभाऊ अमन हरीचंद्र सतनामी हा शिवीगाळ करु नकोस असे सांगत असताना मनीष निशाद यास राग आल्याने त्याने घरातुन चाकु घेवुन येवुन अमन याचे पोटात मारुन गंभीर जखमी केले.
त्यानंतर अमन हरीचंद्र सतनामी यास त्याचे नातेवाईकांनी औषधोपचारासाठी साई माऊली हॉस्पिटल,अहमदनगर येथे दाखल केले परंतु औषधोपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.सदर घटनेची माहिती तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांना मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे हे त्यांचे तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदारांसह तात्काळ घटनास्थळी तसेच हॉस्पिटल मध्ये जावुन घटनेची माहिती घेतली. सदरचा गुन्हा आरोपी मनीष ऊर्फ पुकु तिरीथ निशाद यानेच केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा घटनास्थळी तसेच ढवण वस्ती,तपोवन रोड परिसरात शोध घेतला असता तो मिळुन आला नाही.
त्यानंतर आरोपी मनीष ऊर्फ पुकु तिरीथ निशाद हा त्याचे गावी छत्तीसगड येथे पळुन जाण्यासाठी काही वेळापुर्वी निघाला असल्याची माहिती मिळाली परंतु तो नक्की कोणत्या दिशेने गेला हे माहिती नसल्याने अहमदनगर रेल्वेस्टेशन, बसस्टँड,मनमाड हायवे अशा ठिकाणी तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे चार पथके आरोपीला ओळखत असलेल्या इसमांसह रवाना झाले.त्यानंतर अहमदनगर ते छत्रपती संभाजी नगर हायवे रोडला गेलेल्या पथकास एक इसम हायवे रोडचे बाजुला वाहनांना हात करत असल्याचे दिसुन आले. आरोपीस ओळखणाऱ्या इसमाने आरोपी मनीष यास ओळखले.पोलीस स्टाफ त्यास ताब्यात घेण्यासाठी त्याचे जवळ जात असताना तो पळुन जाऊ लागला.त्यावर पोलीस स्टाफने आरोपी मनीष ऊर्फ पुकु तिरीथ निशाद यास पाठलाग करुन ताब्यात घेतले असुन गुन्ह्याचे तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती, तोफखाना पोनि.श्री. आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. श्री.उज्वलसींह राजपुत, पो.उप.निरी.सचिन रणशेवरे,पोउपनिरी. शैलेश पाटील व तोफखाना पोलीस स्टेशनचे अंमलदार यांनी केली आहे.