एक मुष्टी धान्य समाजसेवेचा वसा;दिवाळी निमित्त रेणावीकर शाळेच्या वतीने स्नेहालयातील विद्यार्थ्यांना ४०० किलो गहू भेट
अहिल्यानगर (दि.२३):- म.ए.सो.रेणावीकर विद्या मंदिर,सावेडी यांच्या माध्यमातून ‘एक मुष्टी धान्य’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांमध्ये समाजकार्याची जाणीव आणि सामाजिक बांधिलकी विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात पहिली ते सातवीतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
शाळेच्या वतीने जवळपास 400 किलो गहू जमा करून स्नेहालयातील लाभार्थ्यांना दिवाळीच्या निमित्ताने भेट देण्यात आले.या कार्यक्रमाच्या प्रसंगी स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक श्री.प्रविण कदम यांनी स्नेहालय संस्थेची सविस्तर माहिती दिली आणि उडान प्रकल्पाची विशेष माहिती सादर केली.उडान प्रकल्प हा विशेषतःबालविवाह प्रतिबंधक आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असून,या प्रकल्पाच्या माध्यमातून बालविवाह झालेल्या किंवा धोक्यात असलेल्या मुलींसाठी पुनर्वसन आणि शिक्षणाच्या संधी पुरवल्या जातात. प्रकल्पात मुलींना सुरक्षितता,शैक्षणिक मदत,तसेच कौटुंबिक आधार मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.
बालविवाह होत असल्यास ताबडतोब चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर किंवा उडान प्रकल्पाचा हेल्पलाइन नंबर 9011026495 द्वारे बालविवाहासंबंधी कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित मदत मिळू शकते.श्री.कदम यांनी सांगितले की,या उपक्रमामुळे अनेक मुलींना त्यांचे हक्काचे जीवन जगण्याची संधी मिळाली आहे. बालविवाहाच्या घटना कमी करण्यासाठी जागरूकता वाढवणे आणि समाजातील लोकांचा सहभाग सुनिश्चित करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.या उपक्रमाच्या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे,उडानचे प्रतिनिधी श्री.शाहिद शेख,युवा निर्माण प्रकल्प व्यवस्थापक श्री.विकास सुतार,ज्येष्ठ शिक्षिका सौ.महाजन,सौ.पांडकर, तसेच पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सारसर यांनी केले,तर आभार प्रदर्शन श्री.विशाल बडे यांनी मानले.