ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास
अहिल्यानगर प्रतिनिधी:-राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या स्वच्छते मोहिमेमुळे झाडाझुडपात आणि प्लास्टिकच्या विळख्यात अडकलेल्या किल्ल्यातील बुरुजांनी मोकळा श्वास घेतला.स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.उद्धव शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली.
या मोहिमेत ४० जण सहभागी झाले होते.या मोहिमेत टुरिष्ट गाईड अमोल बास्कर, प्रवीणदादा मोहरकर, प्रविण झरेकर आदी सहभागी झाले होते. किल्ल्यातील बुरुजांवर उगवलेली झुडपे मुळासकट उपटून काढल्यामुळे त्यांचे आयुष्यमान वाढण्यास मदत होणार आहे.तसेच या बुरुजांवर जाण्यासाठीच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडूपे वाढली होती.ती काढून टाकली.या स्वच्छता मोहिमेदरम्यान प्लास्टिकच्या बाटल्या व प्लास्टीक कचराही गोळा करण्यात आला.सकाळी ८ वाजता सुरू झालेली ही स्वच्छता मोहीम दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू होती.
किल्ल्यात नजरेस पडेल तो कचरा गोळा करावा
या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात येणाऱ्या प्रत्येकाने आपल्या नजरेस पडेल तो कचरा गोळा करावा जेणेकरून किल्ला स्वच्छ राहील. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटक येथील स्वच्छतेचा आदर्श आपल्या सोबत घेऊन जातील.किल्ल्यात येणाऱ्यांनी आपल्या सोबतच्या पाणी पिण्याच्या बाटल्या सोबतच घेऊन जाव्यात जेणेकरून कचरा होणार नाही,असे आवाहन डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.