Maharashtra247

दोन एकर जागेत साकारतेय महानगरपालिकेचे भव्य क्रीडा संकुल;इनडोअर व आऊटडोअर खेळांसाठी मैदाने,हॉलचा समावेश;आमदार संग्राम जगताप यांनी ३ कोटी ४३ लाख रुपयांचा दिला निधी 

 

अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरातील रस्ते, पाणी व वीज या पायाभूत सुविधांचा प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याचे नियोजन महानगरपालिका करत आहे.त्यासह नागरिकांना मनोरंजन,विरंगुळा,आरोग्य सेवांसह खेळाडूंना चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा संकुलाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

सारसनगर परिसरात सुमारे दोन एकर जागेत सर्व अत्याधुनिक सुविधांचा समावेश असलेल्या या क्रीडा संकुलाच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या सहा महिन्यांत हे क्रीडा संकुल नागरिकांसाठी खुले होईल, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

आयुक्त यशवंत डांगे यांनी कामाची पाहणी करून आढावा घेतला. महानगरपालिकेच्या माध्यमातून साकारल्या जात असलेल्या या प्रकल्पासाठी आमदार संग्राम जगताप यांनी ३ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी जिल्हास्तर सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानातून उपलब्ध करून दिला आहे. या क्रीडा संकुलात विविध प्रकारच्या इनडोअर व आऊटडोअर क्रीडा प्रकारांसाठी मैदाने व सुविधा देण्यात येणार आहेत. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींना या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.क्रीडा संकुलात टेनिस कोर्ट, व्हॉलीबॉल, बास्केट बॉल, बॉक्स क्रिकेट, कबड्डी आदी विविध खेळांसाठी मैदाने असणार आहेत. तसेच बॅडमिंटन हॉल, टेबल टेनिस, रायफल शूटिंग, बॉक्सिंग रिंग, मल्टिपर्पज हॉलमध्ये कॅरम, बुद्धीबळ अशा व इतर इनडोअर खेळांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या खेळांच्या स्पर्धा भरविता येतील, अशा पद्धतीने सर्व प्रकारच्या सुविधा खेळाडूंना उपलब्ध होणार आहेत. तसेच, या भव्य क्रीडा संकुला भोवती मोठी संरक्षक भिंत व नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक उभारण्यात येणार आहे. सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी अत्याधुनिक यंत्र व साधने असणारी जिम, योगासाठी हॉल व झुंबासाठीही स्वतंत्र हॉल उभारण्यात येणार असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

 

You cannot copy content of this page