अहिल्यानगर (दि.५ प्रतिनिधी):-कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांच्या प्रयत्नांमुळे कोपरगाव तालुक्यात मौ.जेऊर कुंभारी गावातील दोन वेळा न्यायालयाचा निकाल लागूनही किरकोळ गैरसमजांमुळे बंद असलेला शेतरस्ता तहसीलदारांनी बांधावरच न्यायनिवाडा करून खुला केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मौ.जेऊर कुंभारी गावातील १० फूट रुंदीचा व ६०० मिटर लांबीचा रस्ता सख्ख्या चुलत्या – पुतण्यातील वादात अडकला होता. त्यामुळे दोघांमध्ये कटुता निर्माण झाली होती. हे प्रकरण दोन पिढ्यापासून सुरू होते. दोघी बाजूंनी न्यायालयाच्या पायऱ्याही झिजविल्या. शासकीय कार्यालयाचे हेलपाटेही झाले. दोघांच्या वेळ आणि पैसा खर्च झाला, दोनदा न्यायालयात निर्णयही झाला. असे असतांनादेखील वाद संपुष्टात येत नव्हता. अशावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे निर्देश दिल्याने त्याचाच एक भाग म्हणून तहसीलदार सावंत यांनी सुरू केलेल्या बांधावर न्यायनिवाडा करण्याच्या मोहिमेंतर्गत या प्रकरणाकडे लक्ष घातले.
त्यांनी शेतावर जावून दोघी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. किरकोळ गैरसमजातून दोघांचे नुकसान होत असल्याचे त्यांना पटवून दिले. संवेदनशील पद्धतीने सामंजस्य दाखविण्याचे दोघांना आवाहनदेखील केले. एकाने मोठेपणा दाखविणे आणि दुसऱ्याने माघार घेणे यात दोघांचे मोठेपण असल्याचे सावंत आणि इतर उपस्थित पंचांनी त्यांना पटवून दिल्याने दोन्ही २ वेळा न्यायालयाचे निर्णय होवूनही न मिटलेला आपापसांतील शेतरस्त्याचा वाद मोक्यावरच मिटवून घेण्यासाठी तयार झाले आणि आपापसात तडजोड करीत वाद मिटवला. हा शेतरस्ता आपपसांतील सहमतीने प्रतिवादीने (चुलत्याने) वादीला (पुतण्याला) मोकळा करून दिला. वादापोटी एकमेकांवर धावून जाणारे चुलते – पुतण्यांनी आपल्या भावनांना वाट करून देत एकमेकांना मिठीदेखील मारली आणि हा प्रसंग पाहून ग्रामस्थांना देखील आनंद झाला.
शेतकऱ्यांचे बरेचसे रस्त्यांचे वाद-विवाद हे किरकोळ गैरसमज किंवा थोडासा मीपणा बाजूला ठेवला तर जागेवरच मिटू शकतात. शेतकऱ्यांना कोर्टकचेरी , पोलीस केसेस करणे परवडत नाही. यामुळे वेळेचा व पैशांचा अपव्यय तर होतोच सोबत शेतीकडेही दुर्लक्ष होते , वैमनस्यात वाढ होत जातो आणि शेतकरी हा नेहमी तणावपूर्ण मानसिकतेत राहतो. दोघांनाही जिवापाड जपलेल्या शेतीची रस्त्याच्या भांडणापाई व कोर्ट केसेस लढवतां लढवतां ती जमीनच विक्री करण्याचीही कधीकधी वेळ येते. परंतु दोघांनीही मनाचा थोडासा मोठेपणा दर्शवला व मीपणा थोडावेळ दूर ठेवला तर मागच्या दोन पिढ्यांपासून चालत आलेला वाद पुढच्या पिढ्यांना करावा लागणार नाही हे तहसीलदार कोपरगाव महेश सावंत व इतर उपस्थित पंचांनी समजावून सांगितल्यावर सुरुवातीला एकमेकांवर धावून जाणारे शेतकरी जे भावनिक होतं फिल्मी स्टाईलमध्ये एकमेकांना भेटले .
सख्खे चुलते पुतणे यानिमित्ताने आपापसांतील गैरसमज व भांडणतंटा दूर करून एकत्र आल्याचा आनंद सर्वच उपस्थितांना झाला . वादी व प्रतिवादी तसेच त्यांचे नातेवाईक व उपस्थित प्रतिष्ठित पंच यांनी प्रशासनाचे आभार मानले.
अशाच प्रकारचा चुलते – पुतणे यांच्यातील आणखी एक शेतरस्ता आडवल्याबाबतचा वाद कोपरगाव तालुक्यातील मौ. शाहजापूर येथेही सुरू होता. हाणामारी आणि भांडणे होवून पोलीस स्टेशनला अनेकदा तक्रारी होवून गुन्हेही दाखल झाले होते. परंतू याच पद्धतीने शेतकऱ्यांना समजावून सांगत हा वाददेखील बांधावरच मिटविण्यात आला. प्रशासनाने संवेदनशीलतेने काम केल्यास नागरिकांचे प्रश्न सहजपणे सोडवून त्यांना दिलासा देता येतो हे कोपरगावच्या महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांचे प्रश्न सोडूवन दाखवून दिले आहे.
महेश सावंत,तहसीलदार, कोपरगाव- शेतकऱ्यांचे बरेचसे रस्त्यांचे वाद – विवाद हे किरकोळ गैरसमज दूर सारून आणि सामंजस्याने जागेवरच मिटू शकतात . शेतकऱ्यांना कोर्ट कचेरी पोलीस केसेस करणे परवडत नाही.यामुळे वेळेचा व पैशांचा अपव्यय तर होतोच सोबत शेतीकडेही दुर्लक्ष होते, वैमनस्यात वाढते आणि त्यामुळे शेतकरी हा नेहमी तणावपूर्ण मानसिकतेत राहतो. बऱ्याचदा अशा प्रकरणात जमीनच विक्री करण्याचीही कधीकधी वेळ येते. पुढच्या पिढीलाही यामुळे त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच अशी प्रकरणे संवादाद्वारे सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाने बांधावर जावून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची मोहीम सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे या मोहिमेला चांगले यश मिळते आहे.