अहिल्यानगर (प्रतिनिधी):-भारतीय संविधानाने महिलांना समान दर्जा आणि अधिकार दिल्याने शिक्षण आणि नोकऱ्यातील त्यांची भागीदारी वाढली आहे.तथापि मुली आणि महिलांबाबत अनेक कुटुंबात आणि समाजात मध्ययुगीन दृष्टीकोन बाळगला जात असल्याने त्यांच्यावरील अत्याचार पूर्वीपेक्षा अमानुष झाल्याची खंत गेली सात दशके महिलांसाठी कार्यरत 94 वर्षांच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुधा भालचंद्र कारखानीस यांनी व्यक्त केली.बहुविध कारणांनी संधीवंचित आणि उपेक्षित असलेल्या मुली – महिलांना पूर्णतः मोफत आणि निवासी स्वरूपात रोजगार शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र *सक्षमा प्रकल्प* स्नेहालय संस्थेने केडगाव येथे उभारला. सक्षमाचे लोकार्पण काल झाले.
द न्यू इंडिया एश्शुरन्स कंपनीने या संकुलाच्या उभारणीसाठी आर्थिक सहयोग दिला. यावेळी या कंपनीचे विभागीय व्यवस्थापक प्रेमचंद मोरे आणि अभय अकोले, वरिष्ठ व्यवसाय व्यवस्थापक भगवान पवार, अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष एडवोकेट जयंत ओहोळ, देसरडा भंडारी अकादमीचे संचालक सौ. स्नेहा आणि सीए संदीप देसर्डा , लष्कराच्या अहमदनगर येथील रुग्णालयाच्या प्रमुख कर्नल डॉ. रितिका कारखानीस,स्नेहालयाच्या अध्यक्षा जयाताई जोगदंड, सचिव डॉ. प्रीती भोंबे , खजिनदार गीता कौर, विश्वस्त रूपाली मुनोत, पुणे येथील स्वरूपवर्धिनी संस्थेचे संस्थापक संचालक शिरीष पटवर्धन आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रातील 3 बालकांचे दत्तक विधान करण्यात आले. सक्षम केंद्रातील प्रशिक्षण वर्ग प्रयोगशाळा आणि वसतिगृहाच्या कक्षांना राष्ट्रमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई भिमराव आंबेडकर तथा रमाई, पंडिता रमाबाई सरस्वती ,फ्लॉरेन्स नाइटिंगेल, सुलताना चांदबीबी, कल्पना चावला, नगरच्या थोर समाजसेविका जानकीबाई आपटे आदींची नावे देण्यात आलेली आहेत. त्यांचीही उद्घाटने यावेळी झाली.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्घाटन सोहळ्याला उपस्थित सौ.सुधा कारखानिस यांनी भारतातील महिला आणि मुलींच्या सर्वांगीण अवस्थेबद्दल या कार्यक्रमात अभ्यासू मांडणी केली. त्या म्हणाल्या की, मुली आणि महिलांवर अत्याचार होत असताना सुशिक्षित, देशभक्त इत्यादी बिरूद मिरवणारे दुर्लक्ष करताना दिसतात.सामाजिक कर्तव्यहीनतेमुळे मुलींचे आणि महिलांचे जीवन संकटात असताना आजही बहुतांश लोक बघ्याची भूमिका घेतात, हे देश म्हणून चिंताजनक आहे.श्री प्रेमचंद मोरे म्हणाले की, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी भारतातील जगातील विमा क्षेत्रातील सामाजिक दायित्व जपणारी अग्रणी कंपनी आहे.व्यवसायात मिळवलेल्या नफ्यापेक्षाही आम्हाला समाजासाठी देत असलेल्या योगदानाचा आनंद जास्त वाटतो. संपूर्ण देशभरात वंचितांचे जीवन बदलण्यासाठी ध्येयवादी आणि उत्तम सामाजिक संस्था निवडून त्यांच्यासोबत काम करण्याचा कंपनी प्रयत्न करते, असे श्री.मोरे यांनी नमूद केले
नगरची नवी ओळख
स्नेहालय संस्थेच्या बहुविध प्रकल्पांमुळे अहिल्यानगरला जगाच्या सामाजिक नकाशावर अग्रणी स्थान मिळाल्याचे आयुक्त डांगे यांनी नमूद केले. लवकरच महानगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी स्नेहालय सोबत महानगरपालिका काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.सी ए संदीप देसर्डा यांनी सक्षमा केंद्रात अकाउंटंट प्रशिक्षणासारखा उपक्रम चालू करण्यात पुढाकार घेण्याची घोषणा केली. सक्षमाचे बांधकाम जेएमआर बिल्डकॉन कंपनीचे अभियंता ओंकार म्हसे यांनी केले वास्तू आराखडा अश्वत्थ डिझाईन स्टुडिओचे आर्किटेक्ट रोहित साळुंखे यांनी केला. महिला आणि बालविकास क्षेत्रातील स्नेहालय हा सर्वात विश्वासार्ह ब्रँड बनवला आहे. बालविवाह, बालकांची अनैतिक मानवी तस्करी, बाल लैंगिक शोषण , स्त्रीभ्रूणहत्या बाल मातांचे प्रश्न यात संस्थेने केलेले कार्य देशात अग्रणी आणि पथदर्शी समजले जाते, असे एडवोकेट ओहोळ यांनी यावेळी नमूद केले.येथील रुग्णसेवा अभ्यासक्रमासाठी स्व. भैरूलालजी कांकरिया यांच्या स्मरणार्थ अनमोल गणेश कांकरिया यांनी सर्व सर्जिकल साहित्य, रुग्ण उपचार साहित्य सहयोग म्हणून दिले. गेली चार दशके जिल्हा शासकीय रुग्णालयांमधून परिचारिका प्रशिक्षण देणाऱ्या राजश्री रवींद्र कुलकर्णी यांनी रुग्णसेवा अभ्यासक्रमाचे प्राचार्य पद स्वीकारले. या सर्वांचा यावेळी गौरव करण्यात आला.
नवी पहाट
सक्षमा प्रकल्पात बालमाता, बालवेश्या, अत्याचारित महिला, झोपडपट्टी – आदिवासी आणि ग्रामीण भागातील अल्पशिक्षित गरीब व गरजू मुली , देह व्यापारातून मुक्त झालेल्या महिला, विविध अनाथालयांमधील 18 वर्षे पूर्ण झालेली बालके यांच्यासाठी 3 महिन्यांचा रुग्ण सहाय्यक किंवा बेडसाईड असिस्टंट हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. रोजगार शिक्षणाचे अन्य विविध उपक्रम येथे राबविले जाणार आहेत. हे सर्व उपक्रम मोफत आणि परगावच्या मुला मुलींसाठी निवासी स्वरूपाचे आहेत. रुग्ण सहाय्यक अभ्यासक्रमात 30 तर अन्य अभ्यासक्रमात 70 लाभार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. रुग्ण सहाय्यक अभ्यासक्रमासाठी प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्रवेश उपलब्ध असल्याचे सक्षमा केंद्रा च्या समन्वयक दीपाली बुरडे यांनी सांगितले .
येथील प्रवेशाच्या संदर्भात माहितीसाठी +91 90116 35200 येथे संपर्काचे आवाहन संस्थेने केले आहे.
संगीता सानप. जनसंपर्क अधिकारी स्नेहालय-9011020178