कार्यक्षम आणि कर्तव्यनिष्ठ ग्रामपंचायत अधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करून साजरा..हरिष गडाख यांनी वाढदिवसा निमित्त रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा पाया आहे.गावांचा सर्वांगीण विकास करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सरपंच व ग्रामसेवक करत असतात.‘ग्रामविकास आणि कृषिविकास’ या दोन्ही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून गावाची विकासाच्या दिशेने वाटचाल व्हावी व नवनवीन शासकीय योजना गावातील नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेले शांत,संयमी,मितभाषी,पारदर्शक कामकाज करणारे कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत अधिकारी म्हणून हरिष गडाख लोकांना परिचित आहेत.
कार्यक्षम आणि कर्तव्यनिष्ठ असे ग्रामपंचायत अधिकारी हरिष गडाख यांचा वाढदिवस ग्रामस्थांनी आरोग्य शिबिर आयोजित करून साजरा केला.त्यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिर,सर्व रोग निदान शिबिर,रक्तदान शिबिर यांचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरास हिवरगाव पावसा ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सरपंच सुभाष गडाख म्हणाले की,प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होऊन त्या माध्यमातून जनसामान्यांची सेवा करायचे ध्येय उराशी बाळगून ग्रामपंचायत अधिकारी असलेले हरिष गडाख कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून लोकांना परिचित आहे.सध्या ते संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पारेगाव या गावी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात हरिष गडाख यांचा जन्म झाला.त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण तर संघर्ष करत माध्यमिक व उच्च शिक्षण पूर्ण केले.कठोर परिश्रम घेत स्पर्धा परीक्षेत यश मिळवले.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चमकदार कामगिरी करत प्रशासकीय सेवेत नोकरी मिळविली असल्याची माहिती देत सरपंच सुभाष गडाख यांनी वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या.हिवरगाव पावसा या ठिकाणी ग्रामसेवक म्हणून ३ वर्षापासून कार्यरत आहेत. तेथे गावात रस्ते, वीज, पाणी,आरोग्य सुविधा, पोषण आहार, महिला व बालकल्याण याबाबत विशेष कामकाज केले आहे. मागील ७० वर्षांपासून गावात शिल्लक असलेला विकास कामांचा अनुशेष भरून काढण्याचे काम हरिष गडाख यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात चालू आहे.ते विकास कामांसाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करतात. सामान्य नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. अश्या प्रकारे कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव तथा पत्रकार नितीनचंद्र भालेराव यांनी हरिष गडाख यांच्या कार्याचे कौतुक केले.तर सामाजिक कार्यकर्ते केशव दवंगे यांनी हिवरगाव पावसा येथे शंभर घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याची माहिती दिली.
याप्रसंगी सरपंच सुभाष गडाख, भाजपा माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,राजहंस दूध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे,देवगड देवस्थानचे अध्यक्ष गणपत पावसे,जेष्ठ संपादक यादवराव पावसे,ओजस्वी भारत फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष उत्तम जाधव,भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे,कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव,जय मल्हार दूध संस्थेचे चेअरमन डॉ.संदीप पावसे,भीमाशंकर पावसे,किरण पावसे,केशव दवंगे व इतर मान्यवर उपस्थित होते.सदरचे शिबिर हिवरगाव पावसा येथील सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या वेळी विविध आजारांवर चिकित्सा करून आवश्यकता असणाऱ्यांना मोफत औषध वाटप करण्यात आले.या शिबिराचा लाभ येथील २०० हून अधिक नागरिकांनी घेतला.११३ व्यक्तींना मोफत चष्मा वाटप केले.या शिबिरात जनरल मेडिसिन,नेत्ररोग,कान,नाक, घसा,त्वचारोग,बालरोग, महिलांचे या विविध आजारांवर वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली. या वेळी मोतीबिंदूचे आजार असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे माहिती सामाजिक कार्यकर्ते गणेश दवंगे यांनी दिली.
सदर शिबिरास नेत्रज्योत फाउंडेशन अहिल्यानगर,डॉ. भानुदास ढेरे आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय कऱ्हे ता.संगमनेर,आधार ब्लड बँक संगमनेर यांचे डॉक्टर व इतर कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.आरोग्य तपासणी शिबिरास हिवरगाव पावसा व पंचक्रोशीतील महिला पुरुष विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी वृंद,विविध संस्था पदाधिकारी,कार्यकर्ते, ग्रामस्थांनी सहकार्य केले.