हिवरगाव पावसामध्ये विद्यार्थ्यांचा नयनरम्य रिंगण सोहळा..देवगड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढली समतेची दिंडी
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-‘वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले,पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर’,अशा विठ्ठलमय वातावरणात हिवरगाव पावसा येथे विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला.विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थ्यांचे रिंगण सोहळा सर्वांचे आकर्षण ठरले.दरवर्षी प्रमाणे यंदाही देवगड माध्यमिक विद्यालय ते हिवरगाव पावसा असा आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. कोणी विठोबा तर कोणी वासुदेव बनले होते. सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पडला. त्यानंतर देवगड माध्यमिक विद्यालय ते हिवरगाव पावसा असे एक किलो मीटर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.गावात आल्यानंतर हिवरगाव पावसा येथील भव्य क्रीडांगणावर पंढरपुरच्या वारीप्रमाणेच रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता.देवगड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समतेची दिंडी काढली.देखणा दिंडी सोहळा पाहण्यासाठी सर्वजन समाज एकत्र आला.मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तूळशी वृंदावन हे बघून हे जणू खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता.
एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा,डोक्यावर टोपी,कपाळी बुक्का,गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली,केसात गजरा,डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली,शाळा शिकताना तहान भूक हरली’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी हिवरगाव पावसा येथील क्रीडागंणावर अवतरले.यावेळी कला संस्कृतीचा ऐतिहासिक वारसा असलेल्या हिवरगाव पावसा गावात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला.अन अवघे गाव दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.
देवगड विद्यालयातील शिक्षकांनी ‘जय जय राम कृष्ण हरी,रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी,ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या अभंगांचे गायन करून टाळ व वीणा यांच्या तालावर ठेका धरत नृत्य तसेच विठ्ठल फुगडी खेळून प्रत्यक्षात श्रीक्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण हिवरगाव पावसा येथील क्रीडागंणावर निर्माण केले.विद्यार्थी आणि शिक्षकानी पारंपारिक वारकरी वेशभूषा,तुळशी व भगवा ध्वज घेऊन अभंगाच्या ठेक्यावर नृत्य व फुगडीचा आनंद घेऊन या नयनरम्य सोहळ्यात आपली भक्ती अभिव्यक्त केली.रिंगण आटोपल्यावर गावातील भजनी मंडळाच्या सहकाऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात विठूरायाची भजने गात ह्या सोहळ्याचा शेवट झाला.तसेच दरवर्षी दिंडीचे आयोजन केले जाते,त्या त्या वेळी पाऊसाने आम्हाला साथ दिली आहे.म्हणून आम्ही हिवरगाव पावसा गावात पंढरपूर उभं करू शकलो.यंदाचा हा रिंगण सोहळा आनंददायी ठरला असून सर्व शाळा कर्मचाऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने हे शक्य झाल्याचे मुख्याध्यापिका श्रीमती.उगले एस.के.यांनी सांगितले.
या दिंडी सोहळ्या प्रसंगी सरपंच सुभाष गडाख,भाजपा माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,देवगड देवस्थानचे अध्यक्ष गणपत पावसे,जेष्ठ संपादक यादवराव पावसे,ओजस्वी भारत फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष उत्तम जाधव,भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे,कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव,भीमाशंकर पावसे,मच्छिंद्र गडाख, प्रभाकर बोऱ्हाडे, अण्णासाहेब गोसावी,नामदेव पावसे,किरण पावसे,केशव दवंगे,भीमा शंकर पावसे,शरद पावसे,रंजना भालेराव,वनिता पावसे व इतर मान्यवर उपस्थित होते.देवगड विद्यालयाच्या मुख्यध्यापिका श्रीमती.उगले एस. के., शिक्षक नेहे व्ही.आर.,माने एम.ए.तातळे एस. एम.,राहाणे आर.बी.,वाघ एस.डी.,थोरात डी.डी.,कुदळ ए. एस.,कातोरे सर,श्रीमती.वर्पे एस.डी.,शिरतार एस.एस.,पवार एस.बी.,भालेराव आर.ए.तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश नगरे यांच्यासह शिक्षक वृंद,हिवरगाव पावसा येथील भजनी मंडळातील सर्व सहकारी,विविध संस्था पदाधिकारी यांनी दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले तर शालेय विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.