भविष्याकडे एक ठोस पाऊल स्नेहालयाच्या केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटलमध्ये ‘ईएनटी’ विभागाचे भव्य उद्घाटन संपन्न
अहिल्यानगर २५ जुलै २०२५ (प्रतिनिधी):-समाजसेवेची नवी दिशा आणि आरोग्यसेवेचा सशक्त विस्तार करत स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे “कर्ण-नासिका-घशाच्या (ENT) शस्त्रक्रिया विभागाचे” भव्य उद्घाटन आज उत्साहात पार पडले. विखे पाटील हॉस्पिटलचे डीन डॉ. सुनील म्हस्के यांच्या हस्ते स्नेहालय पुनर्वसन संकुल, एमआयडीसी, अहिल्यानगर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
या वेळी विखे पाटील मेडिकल कॉलेजच्या मान्यवर डॉक्टरांची उपस्थिती कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजय पाटील (डेप्युटी डीन), डॉ. सतीश मोरे (मेडिकल सुप्रिंटेंडन्ट), डॉ. गौतम आहेर, डॉ. तेजस्विनी मॅडम, डॉ. श्रीकांत पाठक, स्नेहालयच्या खजिनदार गीता कौर, डॉ. चेतन शेळके, डॉ. गणपत वसावे, डॉ. अर्चना ठोंबे हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटलचे संचालक हनिफ शेख यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी संस्थेच्या आरोग्यसेवेसाठीच्या ध्येयधोरणांवर प्रकाश टाकला.डॉ. विजय पाटील सरांनी भावनिक शब्दात स्नेहालयबद्दल आपले मनोगत व्यक्त करत सांगितले, “येथील सेवेची वृत्ती औपचारिक न राहता मनापासूनची आहे. समाजासाठी झटणारी अशी संस्था दुर्मीळ आहे.”
डॉ. सुनील म्हस्के सरांनी आपले स्नेहालयशी असलेले जुने ऋणानुबंध आठवून, “आरोग्यसेवेसाठी आम्ही सदैव तयार आहोत. स्नेहालयच्या उपक्रमांना साथ देणे ही आमची जबाबदारी आहे,” असे उद्गार काढले. या कार्यक्रमात डॉ. श्रीकांत पाठक सरांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. पाठक सर म्हणाले, “या पुढे ENT विभागाच्या आधुनिक सेवा स्नेहालयमधून रुग्णांना उपलब्ध होतील, ही आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे.”डॉ. सतीश मोरे सर यांनी मानसग्रामच्या कार्याला दाद देत सांगितले, “‘सत्यमेव जयते’ ही घोषणा स्नेहालयमध्ये खऱ्या अर्थाने जिवंत आहे.”कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मा. मनोज देशपांडे यांनी केले तर डॉ. चेतन शेळके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या उपक्रमामुळे स्नेहालय आणि विखे पाटील मेडिकल कॉलेज यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होणार असून, ग्रामीण आणि गरजू रुग्णांना आता ENT सारख्या तज्ज्ञ सेवा दर्जेदार स्वरूपात मिळणार आहेत.या उपक्रमासाठी केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली असून, हा कार्यक्रम सामाजिक आरोग्यसेवेच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल ठरले आहे… आपली नम्र
संगीता सानप. मो.9011020178