सुधारला नाहीस तर कायमचा काटा काढू म्हणत माजी नगरसेवकास बेदम मारहाण..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर-शहरातील भाजपाचे माजी नगरसेवक दीपक बाळासाहेब चव्हाण यांच्यावर बुधवारी रात्री गिरमे चौक परिसरात 5 ते 6 अनोळखी इसमांनी प्राणघातक हल्ला केला.जातिवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या धक्कादायक घटनेमुळे शहरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी 24 तासाच्या आत पाच जणांना अटक केली आहे.दीपक बाळासाहेब चव्हाण हे बुधवारी (दि. 1 ऑगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास आपले सहकारी माजी नगरसेवक रवी रमेश पाटील यांच्याकडे काही कामानिमित्त गेले होते. काम आटोपून रात्री साडेदहाच्या सुमारास आपल्या घरी परतत असताना छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील गिरमे चौकाजवळ त्यांचा पाठलाग करत मोटारसायकलवरुन आलेल्या 5 ते 6 इसमांनी त्यांना अडवून अचानक हल्ला केला. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुला समाजसेवेचा पुळका चढला का? अशा अपमानास्पद जातिवाचक शब्दांत शिवीगाळ करत, त्यांच्या गळ्यातील अंदाजे दोन तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावण्यात आली. हल्लेखोरांनी अजून सुधारला नाहीस तर कायमचा काटा काढू अशी धमकीही दिली आणि तेथून पळ काढला.या घटनेमुळे दीपक चव्हाण हे हादरून गेले.
त्यांनी तत्काळ आपल्या मित्र माजी नगरसेवक रवी पाटील यांच्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. रवि पाटील व इतर सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणले. त्यांनी स्वतः हजर राहून सविस्तर तक्रार दाखल केली असून, मारहाणीमुळे वैद्यकीय उपचार घेण्यासाठी त्यांना साखर कामगार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 अंतर्गत कलम 115(2) कलम 126(2) कलम 119 (1) कलम 189(2) कलम 190कलम 191 (2) कलम 351(2) कलम 352 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहे.