पिंपळगाव तुर्क ग्रामपंचायतीत गंभीर अनागोंदीचा आरोप..!..गावाच्या कारभारावर सरपंच पतीचा ‘टक्केवारी राज’ सुरूच..!माजी सरपंच गोकुळ वाळुंज यांची थेट जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार!
पारनेर (प्रतिनिधी):- पारनेर तालुक्यातील पिंपळगाव तुर्क येथील ग्रामपंचायत कारभारावर गंभीर आरोपांची मालिका समोर आली आहे. सध्याच्या महिला सरपंच सौ. सुलोचना सावकार शिंदे यांच्या पतीने सरपंच असल्यासारखा वावर करत “टक्केवारीशाही” चा भयंकर विळखा ग्रामविकासावर आणल्याचा आरोप माजी सरपंच गोकुळ वाळुंज यांनी केला आहे. त्यांनी थेट जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार सादर केली असून गावाच्या कारभारात राजकीय दादागिरी, भूमिगत व्यवहार आणि ग्रामस्थांच्या विकासाच्या स्वप्नांची उधळण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरपंच पती चालवतो एकहाती कारभार!
केलेल्या तक्रारीनुसार,सरपंच सौ. सुलोचना शिंदे या निवडून आल्यापासून त्यांचे पती सावकार शिंदे हेच प्रत्यक्ष कारभार करत आहेत. त्यांनी ग्रामसभा व मासिक बैठकीचेही “हायजॅक” केल्याचे आरोप आहेत. मिटिंगचे प्रोसिडिंग बुक घरी नेले जाते आणि घरी सह्या घेऊन पुन्हा सादर केले जाते. एवढेच नाही तर ग्रामसभा दस्तावेजांवरील अनेक सह्या “बोगस” असल्याचे वाळुंज यांनी म्हटले असून याचे पुरावेही त्यांनी सादर केले आहेत.
काम थांबवून “टक्केवारी” मागणी!
माजी सरपंच वाळुंज यांनी आपल्या कार्यकाळात मंजूर केलेली कामे – दलित वस्ती सुधार योजना (२.५० लाख) आणि साठा बंधारा दुरुस्ती (६.५० लाख) ही केवळ टक्केवारी न मिळाल्यामुळे थांबवण्यात आली, असा थेट आरोप त्यांनी केला आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर फाईल सध्याच्या सरपंचांकडे देण्यात आली, मात्र त्या फाईलवर सह्या करण्यासाठी सरपंच पती सावकार शिंदे यांनी सरळसरळ १५% सरपंच आणि १०% उपसरपंच टक्केवारीची मागणी केल्याचे वाळुंज यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
विकास कामांवर टाच अन.. चौकशीचे हत्यार
“मी दहा वर्षे सरपंच होतो, पण अशी मागणी कधी ऐकली नव्हती. सरपंच पतींच्या टक्केवारीशिवाय ग्रामपंचायतचा एकही चेक सुटत नाही,” अशी खंत वाळुंज यांनी व्यक्त केली आहे. चेक न दिल्यामुळे मार्च महिन्यापासून कामाचे बिल अडवून ठेवण्यात आले. अखेर त्यांच्यात वाद झाल्यावर, मागणी न पूर्ण झाल्यामुळे सरपंच पतींनी कामाची चौकशी सुरू करण्याची मोहिम हाती घेतल्याचा आरोप त्यांनी केला.
“तक्रारींचे राजकारण” आणि पूर्वीचे वाद
ग्रामसेवकांकडून जुन्या कामांची चौकशी करून वाळुंज यांना सतत लक्ष्य केले जात आहे. त्यांच्यातील जुने जमीनविवाद व “राजकीय वैमनस्य” याचं रुपांतर आता शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण करण्यात झाले असल्याचे दिसते. “स्मशानभूमीचे पत्रा शेड अर्धवट अवस्थेत लोळत आहे, कोणालाही पत्ता नाही. हीच पिंपळगाव तुर्क ग्रामपंचायतीची शोकांतिका आहे,” असा संतप्त आरोप माजी सरपंच वाळुंज यांनी केला आहे.
एकमुखी मागण्या:
1. ग्रामसभांचे व्हिडीओ चित्रीकरण बंधनकारक करावे.
2. सरपंच व त्यांच्या पतीचा कारभार तत्काळ चौकशीअंती ताब्यात घ्यावा.
3. अडवलेली विकासकामे तत्काळ सुरू करण्यात यावीत.
एका महिला सरपंचाच्या निवडीनंतर तिच्या पतीने सरपंच असल्यासारखा सत्तेचा दुरुपयोग करणे म्हणजे लोकशाहीची क्रूर थट्टा आहे. यामागे “राजकारण की टक्केवारी?” असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास ग्रामपंचायतींच्या निवडणुका केवळ “कुठल्या पतीला सत्ता मिळेल?” यावरच ठरतील, हे लक्षात घ्यावे!