पाटेवाडीतील मृत आदिवासी महिलेच्या प्रेताची विटंबना.. आरोपींना अटक न झाल्यास वंचित चा ठिय्या आंदोलनाचा इशारा!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- कर्जत तालुक्यातील पाटेवाडी गावात मृत आदिवासी महिला बेबी साईनास पवार यांच्या प्रेताची विटंबना करण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून,या घटनेतील आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने पोलिस प्रशासना विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे.वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार,अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात आरोपींना तातडीने अटक करावी,अन्यथा दि.13 ऑक्टोबर रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा देण्यात आला आहे.या निवेदनावेळी जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, कर्जत तालुकाध्यक्ष पोपट शेटे, शहराध्यक्ष हनीफ शेख,नगर तालुकाध्यक्ष रविकिरण जाधव, भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगारदिवे,शहर महासचिव प्रवीण ओरे,युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे,तसेच मनोज साळवे,फिरोज पठाण,सुरेश पानपाटील,बुधभूषण भिवसने, अजित कुऱ्हाडे,संकेत शिंदे, कौशिक गाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
घटनेविषयी बोलताना नेत्यांनी सांगितले की,पाटेवाडी गावातील संकुचित मनुवादी विचारसरणीच्या व्यक्तींनी मृत महिलेच्या अंत्यसंस्कारास विरोध करून प्रेताची विटंबना केली.या प्रकरणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा क्र. 0521/2025, दि.23 सप्टेंबर रोजी कर्जत पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. तरीसुद्धा आरोपी गावात मोकाट फिरत असून, फिर्यादीवर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांनी कर्जत तहसिल कार्यालयासमोर आंदोलन उभारल्यानंतरच महिलेच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडली होती.परंतु, न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील, असा इशारा जिल्हा नेतृत्वाने दिला आहे.