डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करा..!समस्त मुस्लिम समाजाचा तीव्र निषेध; पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अवमानकारक लिखाण करणाऱ्या व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समस्त मुस्लिम समाजाने केली आहे.या संदर्भात समाजाच्या प्रतिनिधींकडून दि.८ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि न्यायाचे तत्त्व दिले.अशा महामानवाबद्दल अवमानकारक शब्दप्रयोग करणे ही अत्यंत निंदनीय आणि समाजात तणाव निर्माण करणारी कृती आहे. फरीद सुलेमान खान नावाच्या व्यक्तीने डॉ.बाबासाहेबां विषयी अवमानकारक लिखाण केल्याची माहिती समोर आली असून,त्याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या कृत्याचा मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.अशा प्रकारचे द्वेषमूलक वक्तव्य देशातील सामाजिक सलोख्याला धक्का देणारे असल्याचे समाजाच्या प्रतिनिधींनी निवेदनात नमूद केले आहे.या प्रकरणी संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी समस्त मुस्लिम समाजाने केली आहे.