खातगाव टाकळी ग्रामपंचायत मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत विशेष ग्रामसभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग..लोकसहभागाची नवी परंपरा
पारनेर ( प्रवीण तांबे):-पारनेर तालुक्यातील खातगाव टाकळी ग्रामपंचायत येथे दि.17 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत विशेष ग्रामसभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.या विशेष ग्रामसभेत ग्रामविकासासाठी लोकसहभागाचे महत्त्व, ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचा आढावा तसेच शासकीय योजना,नवीन उपक्रम व ग्रामविकास आराखडा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.ग्रामसभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांसह बचत गट,महिला,युवक,शेतकरी, वयोवृद्ध नागरिक,माजी सैनिक संघटना,भजनी मंडळ, सामाजिक कार्यकर्ते सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून लोकसहभागाची नवी परंपरा घडवली.ग्रामसभा ही केवळ चर्चा नव्हे तर गावाच्या विकासाचा पाया असल्याचे सर्वांनी एकमताने व्यक्त केले.

लोकसहभागातून गावचा विकास साधण्यासाठी ग्रामस्थांनी एकदिलाने योगदान देण्याची ग्वाही दिली.या अभियानातून गावात पारदर्शक, लोकसहभागी व सर्वांगीण विकासाचा मार्ग प्रशस्त होणार आहे.यावेळी खादगाव टाकळी ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत अधिकारी सौ.अनुजा लाकूडझोडे/तांबे म्हणाल्या की,मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हा ग्रामविकासासाठी लोकसहभागावर आधारित उपक्रम आहे.या अभियानांतर्गत आयोजित विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायत खातगाव टाकळीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आनंद वाटतो.गावच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक कारभार,लोकसहभाग आणि शासकीय योजनांचा प्रभावी वापर या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेल्या या उपक्रमामुळे गावातील प्रत्येक घटकाला निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येईल,तसेच गावात आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांची उभारणी अधिक वेगाने होईल.ग्रामविकास ही केवळ ग्रामपंचायतीची जबाबदारी नसून ती प्रत्येक ग्रामस्थाची सामूहिक जबाबदारी आहे.त्यामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच ‘समृद्ध गाव, समृद्ध महाराष्ट्र’ हे स्वप्न साकार होईल.
