१४ ऑक्टोबर १९५६ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिन जाणून घेऊया माहिती..
१४ ऑक्टोबर १९५६ हा दिवस भारतीय इतिहासातील एक क्रांतिकारी वळण घेऊन आला. दसऱ्याच्या दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पत्नींसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. या दिवशी तब्बल तीन लाख अनुयायांनी त्यांच्यासोबत धर्मांतर करून बौद्ध धर्म स्वीकारला. हा दिवस आज “धम्मचक्र प्रवर्तन दिन” म्हणून ओळखला जातो.
नागपूर दीक्षाभूमी

डॉ. आंबेडकर हे थोर वकील, विद्वान, अर्थतज्ज्ञ आणि सामाजिक चळवळीतील अग्रणी होते. पण त्यांच्या कार्याचा सारांश काढायचा झाला, तर तो म्हणजे— दलित समाजाला माणूस म्हणून जगण्याचा दर्जा मिळवून देणे, त्यांचा आत्मसन्मान वाढवणे आणि आत्मोद्धाराचा मार्ग दाखवणे हेच त्यांचे महान कार्य होय.
असा झाला बौद्ध धर्माचा स्वीकार
1955 नंतर बाबासाहेबांची प्रकृती ढासळत होती. तरीही ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हे ग्रंथलेखनाचे काम सुरू होते. आपल्याच आयुष्यात हे पुस्तक प्रकाशित व्हावे, ही त्यांची तीव्र इच्छा होती.24 मे 1956 रोजी त्यांनी ऑक्टोबर महिन्यात बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याची घोषणा केली. नागपूर हे ऐतिहासिक स्थळ असल्याने तेथेच दीक्षासमारंभ होणार हे ठरले. 23 सप्टेंबर रोजी त्यांनी एक पत्रक काढून 14 ऑक्टोबरला धर्मांतराची औपचारिक घोषणा केली.11 ऑक्टोबर रोजी बाबासाहेब नागपूरात पोहोचले. त्यावेळी हजारो लोक आधीपासूनच पांढऱ्या वस्त्रांमध्ये दीक्षाभूमीत जमले होते. “बाबासाहेब करे पुकार – बौद्ध धर्म का करो स्वीकार” अशा घोषणांनी नागपूर दुमदुमत होते.
धम्मचक्र प्रवर्तनाचा क्षण
14 ऑक्टोबर 1956 च्या सकाळी बाबासाहेब पांढरा लांब कोट, सदरा व धोतर परिधान करून दीक्षाभूमीत आले. व्यासपीठावर बुद्धाची प्रतिमा व धर्मोपदेशक सज्ज होते. भिक्खु महास्थविर चंद्रमणी यांच्या उपस्थितीत बाबासाहेब व त्यांच्या पत्नीने ‘बुद्धं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि’ या मंत्रोच्चारांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.त्यांनी पंचशील व बावीस प्रतिज्ञा घेत बुद्ध धर्मात प्रवेश केला. त्या क्षणी दीक्षाभूमीवर जयघोष झाला – “बाबासाहेब आंबेडकर की जय, भगवान बुद्ध की जय”.
यानंतर बाबासाहेबांनी स्पष्ट शब्दांत जाहीर केले :
“मी माझ्या जुन्या धर्माचा त्याग करून आज पुन्हा जन्म घेत आहे. बुद्धाने सांगितलेला अष्टांग मार्ग कसोशीने पाळीन. ज्ञान, करुणा आणि समता या तत्त्वांनुसारच माझे जीवन व्यतीत करीन.”
इतिहासातील सुवर्णक्षण
त्या दिवशी जवळपास तीन लाख अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला. विजयादशमीच्या पवित्र मुहूर्तावर घडलेले हे धर्मांतर भारतीय समाजक्रांतीचे नवे पर्व ठरले. 14 ऑक्टोबर हा दिवस त्यामुळे कायम धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून स्मरणात राहिला आहे.
शब्दांकन-आयु.किरण शिंदे