“चालत्या मोटारसायकलवर बिबट्याची झडप! पिंपळगाव तुर्कचे वाळुंज पिता–पुत्र थरारातून बचावले”
पारनेर (प्रतिनिधी):-पिंपळगाव तुर्क (ता.पारनेर) येथील संपत काशिनाथ वाळुंज आणि त्यांचा मुलगा रविंद्र वाळुंज हे शुक्रवारी सकाळी कामानिमित्त सुपा एमआयडीसीकडे मोटारसायकलवर जात असताना जीवघेणा प्रकार घडला.
वडनेर हद्दीमधून म्हसने फाट्याकडे जात असताना,आस्थाना माऊली मंदिराजवळील ओढ्याच्या पुलावर सकाळी सुमारास सात वाजता रस्त्याच्या कडेला दडी मारून बसलेल्या बिबट्याने अचानक चालत्या मोटारसायकलवर झडप घालून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.गाडी वेगात असल्याने दोघांचे जीव थोडक्यात बचावले; मात्र मागे बसलेल्या संपत वाळुंज यांच्या पायाला बिबट्याच्या पंजाने गंभीर दुखापत झाली. तत्काळ त्यांना पारनेर येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.या घटनेची माहिती पिंपळगाव तुर्कचे मा.सरपंच गोकुळ वाळुंज यांनी दिली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने बिबट्याच्या हालचालीवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे.
