“माहेरची साडी” प्रेमाची उब, जगण्याची आशा..!अत्याचारित महिलांना न्याय,स्नेहालयात भावबंधाचा सोहळा…3500 महिलांना दिवाळीची शिदोरी व आपुलकीची भेट
अहिल्यानगर (दि.15 ऑक्टोबर 2025):-देशभरातील न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेता अत्याचारग्रस्त महिलांना त्वरित न्याय मिळावा,यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सचिव न्यायमूर्ती कृष्णाजी सोनवणे यांनी केले.भाऊबीज निमित्ताने “माहेरची साडी – प्रेमाची उब, जगण्याची आशा” हा उपक्रम स्नेहालय संस्थेत भावपूर्ण वातावरणात पार पडला.देहू येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प.उमेश महाराज मोरे,अभंग प्रतिष्ठानचे संस्थापक विकास कंद यांच्या प्रमुख उपस्थितीत 20वा “माहेरची साडी” सोहळा झाला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान न्या.सोनवणे यांनी भूषवले.

भावबंधाचा भावनिक सोहळा
देह व्यापारातील बळी,मानसिक विकारग्रस्त, परित्यक्ता,विधवा, ग्रामीण कष्टकरी व एकल महिलांसह तृतीयपंथीय अशा सुमारे 3500 महिलांना अनामिक भावांकडून नवीन साडी, दिवाळीचा फराळ आणि आनंदाची शिदोरी देण्यात आली.या भावनिक भेटीने महिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले माहेरच्या साडीने पुन्हा दिला जगण्याचा आधार.
“जे का रंजले गांजले” भावस्पर्शी संदेश
ह.भ.प. उमेश महाराज मोरे म्हणाले,
“एकल महिलांना वस्तू देणे ही मदत असते, पण त्यांच्याशी भावनेचे नाते जोडणे — हाच खरा धर्म आहे.”
तर जालिंदर महाराज मोरे यांनी सांगितले,
“धर्मग्रंथ वाचण्यात नाही तर माणुसकीच्या वर्तनातच खरी धार्मिकता आहे.”
स्नेहालयचा उपक्रम – समाजातील दीपस्तंभ
स्नेहालय अध्यक्षा सौ.जया जोगदंड यांनी सांगितले की,
“स्व. धर्मराज औटी गुरुजी यांनी दोन दशकांपूर्वी हा उपक्रम सुरू केला. त्यांच्या जाण्यानंतरही अनेक सामाजिक संस्था त्यांचा वारसा पुढे नेत आहेत.”
अभंग प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विकास कंद म्हणाले,
“ज्ञानेश्वर, तुकाराम यांसारख्या संतांनी वंचितांच्या दुःखात सहभागी होण्यालाच धर्म मानले. आजही तोच संदेश जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो.”
गौरव आणि सन्मान
कार्यक्रमात मयूर मोरे, डॉ. स्वाती आजबे, अनिकेत काळोखे, मळूराज औटी, अँड. भक्ती शिरसाठ, आदी मान्यवरांना गौरविण्यात आले.सौ. स्वाती रानडे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.नगर जिल्ह्यातील सर्व अत्याचारित आणि एकल महिलांचा शोध घेण्यासाठी दीपक बुरम, प्रविण बुरम, अंबादास शिंदे, मजहर खान, मुस्ताक पठाण, विशाल कापसे, अजय वाकडे, सविता कारंडे, मीना पाठक, आशा डोईफोडे, व वनमाला कराळे यांनी परिश्रम घेतले.
“माहेरची साडी” — केवळ वस्त्र नव्हे, तर जगण्याची उमेद!
या साडीने हजारो महिलांना दिला जगण्याचा नवा विश्वास,
भाऊबीज साजरी झाली प्रेमाच्या बंधांनी…
प्रविण मुत्याल समन्वयक स्नेहालय 📞 9011026485
