“ॲडव्होकेट डायरी ही वकिलांची ओळख आणि परंपरा”- प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे..अहमदनगर लॉयर्स को-ऑप. सोसायटीतर्फे 2026 च्या नूतन डायरीचे प्रकाशन
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- अहमदनगर लॉयर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही सन 2026 च्या नूतन ॲडव्होकेट डायरीचे प्रकाशन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.त्या म्हणाल्या, “आजच्या डिजिटल युगातही अनेक वकील बंधू-भगिनी ॲडव्होकेट डायरीचा वापर करतात. त्यामुळे डायरी ही केवळ वह्या नाही, तर वकिलांच्या व्यावसायिक ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे.”

या कार्यक्रमास जिल्हा सरकारी वकील ॲड. सतीश पाटील, लॉयर्स को-ऑप. सोसायटीचे चेअरमन ॲड. लक्ष्मण कचरे, उपाध्यक्ष ॲड. संदीप पाखरे, सेक्रेटरी ॲड. विनायक सांगळे, संचालिका ॲड. अनिता दिघे, अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे, माजी चेअरमन ॲड. भूषण बऱ्हाटे, माजी व्हा. चेअरमन हाफिज जहागिरदार, तसेच अनेक वरिष्ठ ॲडव्होकेट्स उपस्थित होते.सेंट्रल बारचे अध्यक्ष ॲड. अशोक कोठारी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “1983 साली स्थापन झालेली अहमदनगर लॉयर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी आजही वकिलांच्या हिताचे निर्णय घेत कार्यरत आहे. अडचणी आल्या तरी तळमळीने काम करत राहिल्यास संस्थेची प्रगती निश्चित आहे.”
कार्यक्रमात विद्यमान चेअरमन ॲड. लक्ष्मण कचरे यांनी प्रास्ताविक केले. ॲड. अनिता दिघे आणि ॲड. विनायक सांगळे यांनी सूत्रसंचालन केले, तर ॲड. संदीप पाखरे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला आणि ॲड. हाफिज जहागिरदार यांनी आभार मानले.यावेळी श्रीमती अंजू शेंडे यांच्या हस्ते संस्थेच्या सदस्यांना 2026 च्या नव्या ॲडव्होकेट डायरीचे वितरण करण्यात आले.
