सायबर गुन्ह्यांविरुद्ध जनजागृती सायबर पोलीस स्टेशनचे महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेचे प्रशिक्षण
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने सायबर पोलीस स्टेशन, अहिल्यानगर तर्फे आज दि.28 ऑक्टोबर 2025) रोजी महानगरपालिका सभागृहात सायबर अवेअरनेस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास पालिकेचे अधिकारी व कर्मचारी अशा तब्बल 200 ते 250 जणांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे आयोजन श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर आणि श्री.वैभव कलबुर्मे अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या सूचनांनुसार करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस नाईक अभिजीत अरकल यांनी डिजिटल अरेस्ट,मोबाईल हॅकिंग,फेक अकाउंट्स,आर्थिक फसवणूक अशा विविध सायबर गुन्ह्यांविषयी सविस्तर माहिती दिली. “ऑनलाइन फसवणुकीपासून वाचण्यासाठी कोणती काळजी घ्यावी आणि सायबर गुन्ह्यांची चौकशी कशी केली जाते” याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्री.सुदाम काकडे यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांचे प्रकार आणि त्यातून फसवणुकीचे विविध मार्ग स्पष्ट केले.त्यांनी डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती, ओटीपी शेअर न करणे,फेक कॉल, बनावट लिंक, व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल, गुंतवणूक फसवणूक, शेअर ट्रेडिंग घोटाळे, तसेच नायजेरियन फ्रॉड यासंबंधी मार्गदर्शन केले.“अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये आणि कोणत्याही ॲपद्वारे मोबाईल ॲक्सेस देऊ नये,” असे त्यांनी स्पष्ट सांगितले.कार्यक्रमादरम्यान सायबर पोलीस निरीक्षक श्री. मोरेश्वर पेंदाम यांनी मोबाईल दहशतवाद आणि आर्थिक फसवणुकीपासून बचावासाठी उपयुक्त उदाहरणे देत जागरूक राहण्याचे आवाहन केले. प्रा. वैभव लोंढे यांनी 1930 व 1945 या सायबर तक्रारींसाठी असलेल्या टोल-फ्री क्रमांकांची माहिती दिली व “सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी सतर्क राहा, शहाणपणाने क्लिक करा” असे मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिकेचे आयुक्त श्री.यशवंत डांगे,उपयुक्त श्री.मुंडे,उपयुक्त श्री. टेगळे,उपयुक्त श्री.मेहेर लहरे तसेच पोलीस निरीक्षक श्री. मोरेश्वर पेंदाम,पोलीस उपनिरीक्षक श्री.सुदाम काकडे, पोलीस नाईक अभिजीत अरकल, सफो.मोहम्मद शेख आणि प्राध्यापक वैभव लोंढे यांनी विशेष परिश्रम घेतले.
