“तमाशा कलेचा जिवंत वारसा” कोंडीराम आवळे मास्तर सन्मानित..!..कांताबाई सातारकर पुरस्काराने गौरव..मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार सत्कार
संगमनेर (प्रतिनिधी/नितीनचंद्र भालेराव):-राज्यातील तमाशा कलेला उजाळा देणारे जेष्ठ लोकनाट्य लेखक व तमाशा कलावंत कोंडीराम लक्ष्मण आवळे मास्तर (वाई) यांना यंदाचा स्व. कांताबाई सातारकर पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार दिनांक २ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वा. मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे आयोजित समारंभात राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान केला जाणार असून, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील राहणार आहेत.

राज्यातील लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी कवी अनंत फंदी,तमाशा कलावंत पवळा भालेराव, गुलाबबाई संगमनेरकर, लोकशाहीर विठ्ठल उमप व कांताबाई सातारकर यांच्या नावाने दरवर्षी कलावंतांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.त्याप्रमाणे पहिला कांताबाई सातारकर पुरस्कार वाई येथील कोंडीराम आवळे मास्टर यांना जाहीर झाला आहे.मुंबई विद्यापीठाच्या कला विभागाचे प्रमुख व गायक प्रा. गणेश चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने आवळे मास्टर यांची निवड केली. बिकट परिस्थितीवर मात करून त्यांनी तमाशा कला जिवंत ठेवण्यासाठी आयुष्यभर झटत काम केले आहे. त्यांच्या या योगदानाचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.या पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्ह्यातील तसेच राज्यातील तमाशा आणि लोकनाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवर कलाकार उपस्थित राहणार आहेत.या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन समिती सदस्य डॉ. सोमनाथ मुटकुळे, सौ. स्मिता गुणे, आण्णासाहेब काळे, निलिमा घाटगे, सुशांत पावसे व राहूल सोमवंशी यांनी केले आहे.
