रमाई घरकुल घोटाळ्या विरोधात मनपा कार्यालयासमोर उपोषण सुरू..उपोषणास रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचा जाहीर पाठिंबा..भ्रष्टाचार्यांवर गुन्हे दाखल न झाल्यास मोठे जनआंदोलन उभे करणार
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-रमाई घरकुल योजनेतील कथित घोटाळ्या विरोधात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका कार्यालयासमोर 29 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या उपोषणाला आता राजकीय रंग चढला आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाने या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला असून, “घोटाळेबाज अधिकारी आणि संबंधितांवर गुन्हे दाखल झाले नाहीत,तर व्यापक जनआंदोलन उभारले जाईल,” असा इशारा पक्षाने प्रशासनाला दिला आहे.या उपोषणाचे नेतृत्व विकी भालेराव, नितीन साळवे आणि अमोल शेजवळ करत आहेत.त्यांना भेट देत रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा प्रमुख दिनेश गवळे,मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात,युवा शहराध्यक्ष अर्शद लखपती,ज्येष्ठ नेते प्रकाश घोरपडे आणि शाकेर जेके यांनी पाठिंबा जाहीर केला.
उपोषणकर्त्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत
1️⃣ रमाई घरकुल योजनेतील अनुदान यादी क्र.101 मधील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी.
2️⃣ मंजूर नसलेली नावे यादीत समाविष्ट करून पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवले गेले असून, त्यांना न्याय द्यावा.
3️⃣ विभाग प्रमुख अपर्णा थेटे, संबंधित उपअभियंता व स्थानिक राजकीय मंडळी यांच्या संगनमताने घोटाळा झाल्याची चौकशी व्हावी.
4️⃣ दलितांच्या निधीचा गैरवापर केल्याबद्दल अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अपर्णा थेटे यांच्यावर गुन्हा दाखल करावा.
5️⃣ अनुदान यादी क्र.101 मधील सर्व लाभार्थ्यांची कागदपत्र तपासणी करून बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करावी.
6️⃣ लोक शिक्षण प्रसारक मंडळ (PNC) ने सामाजिक न्याय विभागाचा निधी लाटल्याबद्दल संबंधितांवर गुन्हे नोंदवावेत.
पक्षाचे जिल्हा प्रमुख दिनेश गवळे म्हणाले, “रमाई घरकुल योजनेत दलित, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या हक्कांचा सरळसरळ गैरवापर झाला आहे.भ्रष्ट अधिकारी आणि तथाकथित स्थानिक नेत्यांविरोधात कठोर कारवाई न झाल्यास आम्ही सर्व समाजासह मोठं जनआंदोलन उभं करू.”या उपोषणामुळे मनपा प्रशासनावर दबाव वाढला असून, नागरिकांचंही लक्ष आता या प्रकरणाकडे वळलं आहे.
