“जात्यांध मानसिकतेचा भंडाफोड अन्यायाविरोधात मातंग समाजाचा लढा..!१० नोव्हेंबरला अहिल्यानगरात लहू शक्ती भिम शक्ती भव्य मोर्चाचे आयोजन”
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- अहिल्यानगर जिल्ह्यात सामाजिक विषमता, जातीय अन्याय आणि अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे संतप्त झालेल्या मातंग समाजाने अखेर न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. नेवासा तालुक्यातील सोनई येथे मातंग समाजाच्या संजय नितीन वैरागर या युवकावर गावातील जात्यांध प्रवृत्तीच्या लोकांनी जीवघेणा हल्ला केल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर अन्यायग्रस्त समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी १० नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर येथील लालटाकी परिसरातील वीर लहुजी चौकात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोर्चात मातंग समाजाबरोबरच सर्व अन्यायग्रस्त समाजबांधवांनी लक्षणीय संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समाजनेते विजय पठारे यांनी केले आहे.
पठारे म्हणाले की,
“अहिल्यानगर (पूर्वीचा अहमदनगर) जिल्हा हा जातीय अहंकार आणि अन्यायाची दुर्दैवी ओळख बनत चालला आहे. आमच्या समाजावर सतत होत असलेल्या अत्याचारांना आता आम्ही प्रत्युत्तर देणार आहोत. ज्यांच्या मनात मातंग समाजाविषयी तळमळ आहे, त्यांनी न्यायाच्या या लढ्यात नक्की सहभागी व्हावे. हा कोणाच्या घरचा मोर्चा नाही – हा अन्यायाविरोधातला जनआंदोलन आहे.”गेल्या काही वर्षांपासून बौद्ध, मातंग व बहुजन समाजावर अत्याचाराच्या घटना घडत असून, जिल्ह्याचे नाव देशभरात जातीय विद्वेषासाठी चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर हा मोर्चा जिल्ह्यातील सामाजिक न्यायाचा आवाज ठरणार आहे.यावेळी सुनील उमाप, अंकुश मोहिते, रंजीत वैरागर, रामभाऊ वडागळे, संकेत रोकडे, विनोद वडागळे, किशोर उमाप, रामा काते,अमर आदमाने आणि अजय त्रिभुवन आदी मान्यवर उपस्थित होते.
