जामखेडमध्ये वाळू माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई दोन आरोपी ताब्यात तर ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जामखेड परिसरात बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून 5 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाईमुळे वाळू माफियांचे सत्ताकेंद्र हादरले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यात अवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार हृदय घोडके,लक्ष्मण खोकले,शामसुंदर जाधव यांच्या पथकाने विशेष मोहीम हाती घेतली.
ही मोहीम सुरू असताना पथकास गुप्त माहिती मिळाली की,आरणगाव ते हाळगाव रोडने ट्रक (क्र. एम.एच. 12 एफ.सी. 8769) मध्ये वाळू भरून फक्राबाद मार्गे हाळगावकडे नेली जात आहे.यावर तात्काळ पथकाने फक्राबाद शिवारात सापळा रचला. थोड्याच वेळात नमूद ट्रक त्या मार्गाने येताना दिसला. पथकाने वाहन थांबवून तपासणी केली असता ट्रकच्या हौद्यात तीन ब्रास वाळू भरलेली आढळली.चालकाची चौकशी केली असता त्याचे नाव रविंद्र बाळासाहेब पवार (वय 32, रा. आरणगाव,ता.जामखेड) असे समोर आले.त्याने ही वाळू ट्रक मालक शहाजी अशोक जेवे (रा. खडकत,ता.आष्टी,जि.बीड) यांच्या सांगण्यावरून वाहतूक करत असल्याचे सांगितले.पथकाने ट्रकसह 5 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल (वाळू – 30 हजार, ट्रक – 5 लाख) जप्त केला.याप्रकरणी पोना.शामसुंदर अंकुश जाधव (स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं. 599/2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरित्या केली असून जिल्ह्यातील इतर वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
