महिनाभरात ४५ कोटींची वसुली न भरल्यास भूखंड जप्तीची कारवाई..आयुक्त यशवंत डांगे यांचा इशारा..शास्तमाफी नाही थकबाकीदारांची मालमत्ता ताब्यात घेऊ..मोठ्या थकबाकीदारांची नावे जाहीर
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर महानगरपालिकेत थकबाकीदारांचे तब्बल ४५ कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी चारही प्रभाग कार्यालयांना दिले आहेत.थकीत कर न भरल्यास मोकळ्या भूखंडधारकांपासून व्यावसायिक मालमत्ताधारकांपर्यंत सर्वांची मालमत्ता कायदेशीर ताब्यात घेण्यात येईल,असा कडक इशाराही त्यांनी दिला आहे.
महानगरपालिकेच्या मालमत्ताकर आणि पाणीपट्टीची थकबाकी २७५ कोटी रुपयांवर गेली आहे. यात मोबाईल टॉवर,व्यावसायिक मालमत्ताधारक व मोकळे भूखंड धारक मोठ्या प्रमाणात आहेत. वसुली यंत्रणेला गती देण्यासाठी प्रभाग समिती १ व ४ ला प्रत्येकी १५ कोटी, प्रभाग २ ला १० कोटी आणि प्रभाग ३ ला ५ कोटी असे लक्ष्य देण्यात आले आहे.आयुक्त डांगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत थकबाकीदारांची नावं उघडपणे मांडण्यात आली.
आनंदऋषीजी हॉस्पिटल – ₹१५ कोटी
शुभम मंगल कार्यालय – ₹३ कोटी
केशर गुलाब मंगल कार्यालय – ₹१.५० कोटी
व्हिडिओकॉन कंपनी – ₹५ कोटी
शासकीय विभाग (जिल्हा रुग्णालय, पंचायत समिती, रेल्वे, पोस्ट ऑफिस आदी) – ₹६ कोटी
बंद पडलेले मोबाईल टॉवर – ₹४ कोटी
१६,५२४ व्यावसायिक मालमत्ताधारक – ₹७ कोटी
३३,४०७ मोकळे भूखंड धारक – ₹१२ कोटी
या सर्वांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी अधिकाऱ्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली असून, “वसुली न केल्यास संबंधित अधिकारी आणि लिपिकांवर थेट कारवाई होईल,” असा इशारा डांगे यांनी दिला.एप्रिल ते ऑक्टोबर अखेर ३५ कोटी रुपयांची वसुली झाली असली, तरी उर्वरित मोठ्या रकमेचा ताण महापालिकेवर आहे. त्यामुळे “आता शास्तमाफी नाही, थकबाकीदारांनी पैसे भरावेत; अन्यथा मालमत्ता जप्त करून ताब्यात घेण्यात येईल,” असा ठाम संदेश डांगे यांनी दिला आहे.
