महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी ६ डिसेंबरला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करा..!रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रची मुख्यमंत्र्यांना निवेदन
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-महामानव संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रात संपूर्ण सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी,अशी स्पष्ट आणि ठोस मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रतर्फे करण्यात आली आहे.पक्षाचे जिल्हाप्रमुख दिनेश गवळे यांनी हे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविले.या वर्षी ६ डिसेंबर हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन असून, भारतीय संविधान निर्मितीतील त्यांचे अमूल्य योगदान संपूर्ण देशासाठी दिशा दर्शक आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान आणि समाजातील जनजागृती यासाठी हा दिवस राज्यभर सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करण्यात यावा,अशी मागणी पक्षाने जोरदारपणे केली आहे.सामान्य प्रशासन विभागाने मुंबई शहर व उपनगरांसाठी या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर केली असली,तरी राज्यभरातील आणि देशभरातील लाखो अनुयायी चैत्यभूमीसह विविध स्मारकांवर बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे “राज्यात सर्वत्र Public Holiday जाहीर केल्यास नागरिकांना कोणताही अडथळा न येता आदरांजली वाहणे सुलभ होईल व सार्वजनिक व्यवस्थेवरील ताणही कमी होईल,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी पक्षाचे मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात,जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती,ज्येष्ठ नेते प्रकाश घोरपडे,जिल्हा महासचिव राजकुमार अमोलिक,नेते हनु नाना,पूर्व शहराध्यक्ष बाबर खान आदी मान्यवर उपस्थित होते.रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या या मागणीमुळे राज्यभरात चर्चेला उधाण आले असून ६ डिसेंबर सुट्टीबाबतचे राज्य सरकारचे निर्णय काय असेल,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
