तपोवन रोड परिसरात एकाच वेळी तीन बिबट्याची पिल्ले सापडली..नविभागाचा ‘अफवा’ दावा फोल;नागरिकां मध्ये अधिक भीतीचे सावट!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरालगत तपोवन रोड भागात असलेल्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याच्या चर्चा वेगाने पसरत होत्या.नागरिकांनी प्रत्यक्ष दर्शन झाल्याचा दावा करूनही वनविभागाने “बिबट्या नसून ती केवळ अफवा” असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.मात्र आज सकाळी कारळे नामक शेतकऱ्याच्या शेतात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या शेतात एक-दोन नाही तर एकाच वेळी तीन बिबट्याची पिल्ले आढळून आली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ ही माहिती पोलिस व वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पिल्लांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले.मात्र, इतक्या दिवसांपासून सुरू असलेली चर्चा,तसेच नागरिकांनी दिलेल्या पुराव्यानंतरही वनविभागाने “बिबट्या नाही” असा दावा का केला, याबाबत परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.दरम्यान,पिल्ले आढळल्याने परिसरात कुठेतरी मादी बिबट्या देखील असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.वनविभागाने तातडीने परिसर सील करून सापळे व पिंजरे लावण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे.परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं सावट पसरलं असून, या परिसरात जाणे पूर्णपणे टाळण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.स्थानिक ग्रामस्थ,कामगार, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस पथके व वनरक्षकांची गस्त वाढवण्यात आली आहे.अहिल्यानगर शहराच्या हद्दीतच बिबट्यांची पिल्ले सापडल्याची घटना अत्यंत गंभीर असल्याचे नागरिकांचे मत असून, ही घटना वनविभागाच्या दाव्याला मोठी धडक देणारी ठरली आहे.
